Nashik-Sinner : सिन्नरला मंत्री कोकाटे समर्थकांकडून जल्लोष

Manikrao Kokate: लाडू वाटून नागरिकांचे तोंड गोड; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मानले आभार
सिन्नर, नाशिक
सिन्नर : आमदार माणिकराव कोकाटे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने जल्लोष करताना समर्थक व नागरीक.(छाया : संदीप भोर)
Published on
Updated on

सिन्नर : नागपुर येथे रविवारी (दि. 15) झालेल्या मंत्री मंडळ विस्तारामध्ये तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने शहरासह तालुकाभरात त्यांच्या समर्थकांकडून व नागरिकांकडून फटाके फोडून व लाडू वाटून जल्लोष साजरा केला.

Summary

राज्याच्या महायुती मंत्रीमंडळाचा विस्तार रविवारी (दि. 15) रोजी नागपूर येथे संपन्न झाला. यात नाशिक जिल्ह्यातील तिघांची मंत्रीपदी वर्णी लागली. यात मालेगाव बाह्यचे मतदार संघातील आमदार दादा भुसे, दिंडोरी मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ तर सिन्नर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे. या तीनही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेताच जिल्हाभरासह त्यांच्या मुळ मतदार संघ मालेगाव, दिंडोरी, सिन्नर येथे महायुतीच्या कार्यकर्त्त्यांनी तसेच पदाधिकार्‍यांनी जल्लोष केला. तसेच ठिकठिकाणी पेढे वाटत आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंद द्विगुणीत केला.

आमदार कोकाटे निवडणुकीला उभे राहिल्यापासूनच ते फिक्स मंत्री होणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून मानण्यात येत होते. दरम्यान, मंत्री मंडळ विस्तार होणार असल्याच्या बातम्या झळकताच कार्यकर्त्यांकडून सोशल मिडीयासह शहरात मंत्री पदाच्या शुभेच्छांचे बॅनरला ठिकठिकाणी लावले होते. रविवारी (दि.15) शपथविधीसाठीही कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी, तसेच सरदवाडी रोडवरील अजिंक्यतारा परिसरातही सामाजिक कार्यकर्ते अजय गोजरे यांच्याकडून मोठी स्क्रीन लावून शपथविधीचा कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यात आला. याठिकाणीही नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी आ. कोकाटे यांचा शपथविधी बघण्यासाठी गर्दी केली होती. आ. कोकाटे यांनी शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व नागरिकांना लाडूचे वाटप करुन जल्लोष साजरा केला.

माजी राज्यमंत्री स्व. तुकाराम दिघाळे यांच्यानंतर तालुक्याला प्रथमच मंत्रीपद मिळाल्याने नागरिकांकडूनही आनंद साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड, माजी नगरसेवक हर्षद देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष कुंभार, रवि मोगल यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजितदादांनी वादा पाळला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील शहा येथील कार्यक्रमात तसेच निवडुकीच्या प्रचारादरम्यान सिन्नर शहरात प्रचार सभेत कार्यकर्त्यांनी आ. कोकाटे यांना मंत्री देण्याचे बोलल्यानंतर ना. पवार यांनी अरे तुम्ही निवडून तर आण, मंत्रीपद नाही दिले तर मग बोल. हा अजितदादाचा वादा आहे असे सांगितले होते. त्यानुसार ना. पवार यांनी आपला वादा पाळत तालुक्याला मंत्री पद दिल्याने सिन्नरकरांकडून त्यांचे आभार व्यक्त होत आहे.

झेडपी सभापती ते कॅबिनेटमंत्री

सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथे 26 सप्टेंबर 1957 रोजी जन्मलेले व कोणताही राजकीय वारसा नसलेले ड. माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याची पदवी घेतली. त्यांनी राजकारणाची सुरुवात विद्यार्थी संघटना एनएसयूआय संघटनेत प्रवेशाने केली. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरू केला.

जिल्हा परिषद सभापती, सिन्नर पंचायत समिती सभापती ते आमदार असा प्रवास केला. त्यांचा राजकीय प्रवास नेहमीच संघर्षाचा राहिला आहे. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने संधी नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले. 2004 मध्येही त्यांनी जागा कायम ठेवली. यानंतर 2006 मध्ये नारायण राणे यांच्या बंडात कोकाटे यांनी त्यांना साथ देत, ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. 2009 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा सिन्नरची हॅट्ट्रिक करीत तिसर्‍यांदा जागा जिंकली. 2014 मध्ये निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी केली. मात्र, त्यांचा पराभव झाला. 2019 च्या निवडणुकीपूर्वी कोकाटे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी केली. यात कोकाटे विजयी झाले. 2022 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्या गटात सामील झाले. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 41 हजार मताधिक्याने पाचव्यांदा विजय मिळवला. विजयी झाल्यानंतर अजित पवारांनी त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली.

सिन्नर तालुक्यात पूरचारीचे काम, पुन्हा सेझ सुरू करण्यासाठीचे प्रयत्न, नदीजोड प्रकल्प, सिन्नर एमआयडीसीसाठी वाढीव जमीन संपादन करून घेऊन उद्योग क्षेत्रात भरीव काम केले आहे. तसेच आदिवासी समाजातून आलेले स्वातंत्र्यसेनानी राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देणे, खेळासाठी स्टेडियम उभारणी चालू आहे. आमदार कोकाटे यांनी त्यांच्या मतदारसंघातील स्थानिक विकास प्रकल्पांवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. रस्ते, पायाभूत सुविधा, शहरासाठी 100 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून कार्यान्वित केली, ग्रामीण पाणीपुरवठा योजना यासारख्या अनेक समस्यांचे निराकरण केले आहे. 700 कोटींचा पर्यटन प्रकल्प आणि कळसूबाई पीक रोप वे प्रकल्प यासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news