

सिन्नर (नाशिक) : सिन्नर तालुक्यातील शिवडे गावात रविवारी (दि. ४) सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. आपल्या शेतात गहू पिकाला पाणी भरत असताना जेवण करण्यासाठी विहिरीजवळ बसलेल्या ४० वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक झडप घातली. बिबट्याशी झालेल्या झटापटीत शेतकरी आणि बिबट्या दोघेही विहिरीत कोसळले, ज्यामध्ये शेतकऱ्याचा विहिरीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेली माहिती अशी की, शिवडे गावातील मळे परिसरातील सावतामाळी नगर येथील रहिवासी असलेले गोरख जाधव (वय ४०) हे रविवारी सकाळी आपल्या शेतात गव्हाला पाणी भरण्यासाठी गेले होते. सकाळी साधारण ९ ते १० च्या सुमारास कामातून थोडा वेळ काढून ते विहिरीच्या काठावर जेवण करण्यासाठी बसले होते. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर मागून हल्ला केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी जाधव यांनी बिबट्याशी झुंज दिली, मात्र या झटापटीत दोघांचाही तोल गेल्याने ते खोल विहिरीत पडले. दुर्दैवाने पाण्यात बुडून गोरख जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी विहिरीजवळ मोठी गर्दी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून सिन्नर पोलीस आणि वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बेलू गावचे प्रसिद्ध जीवरक्षक गोविंद तुपे यांना पाचारण करण्यात आले. तुपे यांनी मोठ्या मेहनतीने विहिरीच्या खोल पाण्यातून गोरख जाधव यांचा मृतदेह बाहेर काढला.
परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून वारंवार तक्रारी करूनही वनविभाग ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गोरख जाधव यांच्या निधनामुळे शिवडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण असून, नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे.