

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलत्या घडामोडींचा परिणाम बांधकाम साहित्याच्या बाजारपेठेवर होत असून, बीड्युमिन अर्थात डाम्बराच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. अवघ्या सहा महिन्यांत डांबरचे दर जवळपास दुप्पट झाल्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्ते विकासकामांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निविदा मंजूर करताना निश्चित केलेले दर आणि सध्याच्या स्थितीतील बाजारभाव यामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याने ठेकेदारांनी एकजुट केली असून, वाढीव दरांनुसार स्टार रेटचा लाभ देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याला ३१ ऑक्टोबर रोजीच्या धर्मध्वजारोहण सोहळ्याने सुरुवात झाली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकसह राज्यातील अन्य धार्मिक स्थळांवर सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.
यातील जवळपास ९५ टक्के कामे नाशिक-त्र्यंबकसह ग्रामीण भागात सुरू आहेत. नाशिक शहरातही २८ हून अधिक नवीन रस्ते आणि रस्ते रुंदीकरणाची कामे सुरू असून, त्यापैकी सुमारे ७० टक्के कामे डांबरीकरणाशी संबंधित आहेत. यातील ४० टक्के कामांना स्टार रेट मंजूर करण्यात आला आहे, तर ३० टक्के कामांना अद्याप स्टार रेटची तरतूद नाही.
काही महिन्यांपूर्वी महापालिकेने सर्व रस्ते कामांसाठी सरसकट स्टार रेट मंजूर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यासाठीचा खर्च नगरसेवक निधीतून करण्याचे प्रस्तावित असल्याने नगरसेवकांनी विरोध केला. परिणामी, हा निर्णय मागे घेण्यात आला.
दुसरीकडे, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून शासन निधीतून रस्त्यांची कामे केली जात असल्याने कार्यारंभ आदेशाच्या वेळी असलेले साहित्याचे दर आणि प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी असलेले दर यातील फरकाची रक्कम शासनाकडून देण्याचे निश्चित करण्यात आले होते.
शासनानेही ही तफावत भरून देण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, वाढत्या दरांमधील फरकाची रक्कम प्रत्यक्ष कधी आणि कशी पद्धतीने अदा होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने ठेकेदारांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे.
सिंहस्थ कामे लांबण्याची शक्यता
डांबरच्या वाढत्या किमतीमुळे रस्ते कामांचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. मार्च २०२६ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याची मुदत असताना दरवाढीचा तिढा कायम राहिल्यास निर्धारित वेळेत कामे पूर्ण होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
डांबर दरवाढीचा आर्थिक भार कोण उचलणार, वाढीव दरांची भरपाई कधी मिळणार आणि त्याचा रस्ते कामांच्या वेळापत्रकावर काय परिणाम होणार, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
देयके अदा करण्यास अडचणी
सहा महिन्यांपूर्वी बीड्युमिनचा दर प्रतिमेट्रिक टन ४५ ते ५० हजार रुपये होता. हाच दर वाढून सुमारे ८५ हजार रुपये प्रतिमेट्रिक टनापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे निविदेतील मंजूर दरानुसार कामे करणे ठेकेदारांना आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत आहे.
स्टार रेटनुसार वाढीव दरातील फरकाची रक्कम देण्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली नाही. मात्र, राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक येथे हेलिपॅड आणि अन्य पायाभूत सुविधांच्या कामांसाठी निधी खर्च झाल्याने ठेकेदारांची देयके अदा करण्यास अडचणी निर्माण झाल्याची चर्चा आहे.