

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या गर्दीचे तसेच वाहनतळांचे नियोजन प्रशासनामार्फत आतापासूनच सुरू करण्यात आले आहे. शहरात येणाऱ्या आठ प्रमुख रस्त्यांवर पार्किंगसाठी २२ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून जवळपास २६३ हेक्टर क्षेत्रावर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे भाविकांना अधिक पायपीट करावी लागू नये यासाठी पार्किंगपासून नदीघाटापर्यंतचे अंतर दोन ते अडीच किलोमीटरपेक्षा अधिक असणार नाही, यादृष्टीने वाहनतळांचे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्त मनीषा खत्री यांनी दिल्या आहेत.
नाशिकमध्ये येत्या २०२६-२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. संपूर्ण सिंहस्थकाळात सुमारे दहा कोटी भाविक येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यादृष्टीने भाविकांना सुविधा पुरविण्याचे नियोजन प्रशासनातर्फे केले आहे. विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेला वाहनतळांचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नाशिक महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे वाहतुक व्यवस्थापन आणि पार्किंग सुविधांसाठी नियोजन सुरु केले आहे. यासंदर्भात सोमवारी (दि.१८) महापालिका आयुक्त खत्री यांच्या अध्यक्षतेखाली या सर्व विभागांची बैठक पार पडली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक किरण भोसले, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खाडवी, जलसंपदाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, शहर अभियंता संजय अग्रवाल, वाहतूक सेलचे कार्यकारी अभियंता रविंद्र बागूल यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महापालिकेने तयार केलेल्या पार्किंग आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. भाविकांना अधिक पायपीट करावी लागू नये यादृष्टीने पार्कींगस्थळांचे नियोजन करण्यात आले. पार्कींगस्थळांवर भाविक उतरल्यानंतर त्यांना बसद्वारे घाटापर्यंत आणण्याचे तसेच पुन्हा पार्कींग स्थळांवर सोडण्याच्या नियोजनावर बैठकीत चर्चा झाली.
पार्किंग स्थळांमध्ये पेठरोड, दिंडोरी रोड, धुळेरोड, पुणे रोड, गंगापूर रोड, त्र्यंबक रोड, मुंबईरोड, छ. संभाजीनगर रोड आदींचा समावेश आहेत. या पार्किंग स्थळांची बुधवारी(दि.२०) वाहतूक सेल, एसटी महामंडळ, रेल्वे अधिकारी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस अधिकारी हे संयुक्त पाहणी करणार आहेत. या पाहणीचा अहवाल येत्या २१ तारखेला विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे होणाऱ्या बैठकीत सादर केला जाणार आहे.
सिंहस्थात पार्किंगच्या नियोजनासाठी सर्व विभागांतील अधिकारी संयुक्त पाहणी दौरा करणार आहेत. भाविकांची पायपीट होवू नये यासाठी घाट आणि पार्किंगचे अंतर कमीत कमी ठेवण्याचे नियोजन आहे.
प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त, मनपा