

नाशिक : शासकीय तसेच इतर महत्त्वाचे दस्तऐवज छपाई करणाऱ्या राज्यातील नामांकित दी प्रिमियर को-ऑपरेटिव्ह प्रिंटर्स लिमिटेडच्या महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय या संस्थेवर येवला येथील युवा नेते सिध्दांत दराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विद्यमान संचालक आमदार किशोर दराडे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्या जागेवर त्यांचा मुलगा सिध्दांत याची बिनविरोध वर्णी लागली आहे.
मुद्रणालयात शासकीय दस्तऐवज, अहवाल, पुस्तके, नकाशे, भित्तिपत्रके, आणि इतर प्रकाशने यांचे मुद्रण केले जाते. हे सहकारी संस्थेच्या स्वरूपात कार्यरत असून, त्याचे व्यवस्थापन आणि संचालन सहकारी तत्त्वांवर आधारित आहे. मुद्रणालयाची स्थापना १९२५ मध्ये झाली असून, त्याचा उद्देश शासकीय आणि इतर संस्थांसाठी उच्च दर्जाचे मुद्रण सेवा प्रदान करणे हा आहे. या मुद्रणालयाने विविध महत्त्वपूर्ण प्रकाशनांचे मुद्रण केले आहे. ज्यामध्ये मराठी साहित्यातील प्रसिध्द ग्रंथांचा समावेश आहे. संस्थेच्या अकरा जागांपैकी भटक्या जमाती गटात विजय पाटील, शिवाजी राठोड व सिध्दांत दराडे यांनी अर्ज दाखल केले होते. सामारोपाचाराने तोडगा काढण्यात येऊन पाटील व राठोड यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने दराडे यांची बिनविरोध निवड झाली. ऐतिहासिक वास्तू असलेल्या संस्थेवर काम करण्याची संधी कमी वयातच सिध्दांत यांना मिळाल्याने त्यांचे सामाजिक शैक्षणिक व सर्वच स्तरातून यांचे अभिनंदन होत आहे.
समाजकारण, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात आमच्या परिवाराने मोठे योगदान दिले आहे. राज्याच्या सहकारी संस्थेत काम करण्याची अल्पवयात संधी मिळाली असून या माध्यमातून घेतलेला अनुभवाचा जिल्ह्यातील प्रकाशन व सहकार क्षेत्रात उपयोगी आणेल.
सिध्दांत दराडे (नवनिर्वाचित संचालक, महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय, पुणे)