

सातपूर : सातपूर येथील कार्बन नाका येथे दुकानदाराने हप्ता व वस्तू देण्यास नकार दिल्याने संशयिताने दुकानादाराला कोयत्याने डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. जखमी मुलाला सोडविण्यासाठी आलेल्या आई व भावालाही मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूषण आहिरे (२२, रा. श्रमिकनगर, सातपूर), छोटू गांगुर्डे (२३, रा. आयटीआय कॉलनी, श्रमिकनगर), संकेत शिंदे (२४, रा. आयटीआय कॉलनी, श्रमिकनगर) असे तिघा संशयितांची नावे आहेत. तर, यात आकाश मगन डोंगरे, सुनील मदन डोंगरे, लक्ष्मीबाई मगन डोंगरे (६०) हे तिघे जखमी आहेत. आकाश डोंगरे (३२, रा. आयटीआय कॉलनी, श्रमिकनगर) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी रात्री ते कार्बन नाका येथे असलेल्या दुकानावर होते. त्यावेळी संशयित भूषण व त्याचे दोघे साथीदार दुकानावर आले आणि त्यांनी हप्ता मागितला. तसेच दुकानातील वस्तूही मागितल्या. आकाश यांनी हप्ता व वस्तू देण्यास नकार दिला असता, संशयित भूषण याने त्याच्या कमरेला लावलेला धारदार कोयता बाहेर काढला आणि आकाश यांच्या डोक्यात मारला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. तर त्यांची आई लक्ष्मीबाई व भाऊ सुनील हे दोघे दुकानाकडे येत असतानाच, त्यांना गर्दी दिली. ते धावत आले असता, संशयित आकाश यांना मारहाण करीत होते.त्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यावेळी संशयितांनी दोघांनाही धक्काबुक्की करीत त्यांनाही मारहाण केली तर संशयित भूषण याने सुनील यांच्याही डोक्यात कोयत्याने मारून दुखापत केली. त्यानंतर तुमच्याकडे पाहतो असे धमकावून पळून गेले. याप्रकरणी सातपूर पोलिसात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून, हवालदार बेंडकुळे हे तपास करीत आहेत.