लासलगाव : निसर्गाचा लहरीपणा, रासायनिक खते, औषधे यांचे गगनाला भिडणारे दर, वाढता उत्पादन खर्च, त्या तुलनेत उत्पादन खर्चावर आधारित न मिळणारा भाव यामुळे आज शेतीला अच्छे दिन नाहीत, मात्र खर्चात बचत करत सेंद्रिय पद्धतीचा अवलंब, विषमुक्त शेतीकडे वाटचाल तसेच सामूहिक शेतीचा प्रयोग करून शिरवाडे येथील पाच शेतकऱ्यांनी पिकवलेली मिरची थेट विमानाने इंग्लंड येथील सुपर मार्केटसाठी रवाना झाली आहे.
प्रचंड इच्छाशक्ती असली की, माणूस प्रतिकूल परिस्थितीवरही चांगल्या पद्धतीने मात करू शकतो याचे उदाहरण म्हणजे शिरवाडे येथील विजय आवारे, प्रमोद आवारे, रमेश शेळके, अनिल आवारे, भूषण आवारे हे प्रयोगशील शेतकरी. रमेश शेळके व सुरेश शेळके यांनी क्षारपड जमिनीत टोमॅटो, मिरची व द्राक्षे पीक घेतन इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला. शेळके बंधूंची जमीन क्षारपड. पाणीही अत्यंत खराब. जमिनीचा सामू ११ च्या वर तसाच पाण्याचाही सामू १० च्या वर, त्यामुळे कोणत्याही पिकाची वाढ होत नसे. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम गोड पाणी उपलब्ध करून ते तळ्यात साठवले. तरी जमिनीचा सामू जास्तच होता. त्यामुळे त्यांनी शेतीत सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करत मिरचीलागवड केली. शेणखत टाकून त्यावर खतांचा मूळ डोस म्हणून रासायनिक खते न टाकता गांडूळ खत व इतर सेंद्रिय खते टाकली. बोदावर ठिबक सिंचनच्या साहाय्याने पाणी फक्त मुळाशी कसे राहील याची व्यवस्था केली. त्यावर प्लास्टिकचे आच्छादन केले. पीकवाढीसाठी रासायनिक खतांचा वापर टाळून गांडूळ खत पाण्याचा वापर केला. तसेच जिवामृताची फवारणी केली. त्यामुळे पीक बहरून आले. या शेतकऱ्यांना सिन्नर येथील कृषक मित्र ॲग्रो सर्व्हिसेसचे दत्तात्रय बनकर, सूरज खैरनार, अजय आवारे यांनी मार्गदर्शन केले.
रासायनिक खतांनी जमिनीत उष्णता निर्माण झाल्यामुळे, गांडुळे खाली सरकतात, मल्टिप्लायर जमिनीत असे वातावरण निर्माण करतात, त्यामुळे दुसऱ्या वर्षी गांडुळे वर येऊन खत करायला सुरुवात करतात. दरवर्षी एक एकर क्षेत्रात वर्षभर लागवड केलेल्या जमिनीत १२० टन गांडूळ खत होते, त्यामुळे बाहेरून एक रुपयाचेही खत टाकण्याची गरज पडत नाही.
सुनील शिंदे, सेंद्रिय शेती मार्गदर्शक, नाशिक.
आम्ही शेतीत सेंद्रिय पद्धतीचा वापर केला असता, फुगवण, त्याची साठवणूक क्षमता, चव व चकाकी यात आमूलाग्र बदल झाला. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने उच्चांकी उत्पादन येईल.
रमेश शेळके, सेंद्रिय शेती पुरस्कर्ते, नाशिक.
शेतकऱ्यांना पिकवता येते मात्र विकता येत नाही, त्यामुळे त्यांची आर्थिक लूट होते. त्यामुळे शेतकऱ्यांना विषमुक्त शेतीविषयक मार्गदर्शन करून सध्या एक टन मिरचीचे प्लाटून इंग्लंडच्या सुपर मार्केटसाठी रवाना करण्यात आले आहे.
अजय आवारे, कृषक मित्र, नाशिक.