नाशिक : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांनी जगाला सामाजिक समतेचा, न्यायाचा संदेश दिला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार फुलेंचा वारसा चालवत असून, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा, सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. लाडकी बहीण, लाडकी लेक यांसारख्या योजनांच्या माध्यमातून राज्यात सामाजिक समतेचे, न्यायाचे राज्य प्रस्थापित करण्याचे प्रयत्न महायुतीकडून सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. (largest bronze statue of Phule couple in country will be inaugurated by Chief Minister))
फुले दाम्पत्याच्या शिल्पाचे अनावरण
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह भूमिपूजन
सारथी संस्था विभागीय कार्यालयाचे भूमिपूजन
धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह भूमिपूजन
वनभवन इमारतीचे भूमिपूजन
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानातील नूतनीकरण कामाचे लोकार्पण
महिला रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन
इंदिरानगर बोगदा रुंदीकरण कामाचे भूमिपूजन
बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे लोकार्पण
मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिकमध्ये उभारण्यात आलेले फुले दाम्पत्यांचे देशातील सर्वात मोठे ब्रान्झ धातूचे शिल्प सर्वांना हेवा वाटावा, असेच आहे. यातून फुलेंच्या विचारांची प्रेरणा सदैव मिळत राहिल, असा विश्वास व्यक्त करत मुंबई नाका येथील ५४ गुंठे शासकीय जागेवर नायगावच्या धर्तीवर फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नाशिकमधील मुंबई नाका येथे फुले दाम्पत्याच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण, त्र्यंबक रोडवरील मराठा व धनगर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे भूमिपूजन आदी कामांचे लोकार्पण, भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि. २८) पार पडले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
ते म्हणाले की, फुले दाम्पत्याने सर्वसामान्य शेतकरी, महिला, कामगारांच्या हितासाठी सर्वस्व अर्पण केले. जगाला सामाजिक समतेचा संदेश दिला. नाशकात उभारलेले हे शिल्प ब्रान्झ धातूचे असले, तरी त्यांच्या कार्यापुढे सोन्याची चमकही फिकी पडावी, असे आहे. प्रगतशील, पुरोगामी महाराष्ट्रात फुले यांच्या विचारांमुळे सामाजिक न्यायाचा पाया रचला गेला. त्यामुळेच पुण्यातील भिडे वाड्याच्या जागेत उभारण्यात येत असलेल्या स्मारकासाठी राज्य शासनाने 100 कोटी रुपये मंजूर केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन होत आहे. राज्यातील फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी यांसारख्या सरकारकडून राबविण्यात येत असणाऱ्या योजनांमागे फुले दाम्पत्याचीच प्रेरणा आहे. फुले यांचे स्मारक उभारण्याची संधी मिळाली, हे या सरकारचे भाग्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांचीही भाषणे झाली. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर, पालकमंत्री दादा भुसे, आमदार महादेव जानकर, खासदार राजाभाऊ वाजे, माजी खासदार समीर भुजबळ, हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार सरोज अहिरे, आमदार किशोर दराडे, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, माजी आमदार पंकज भुजबळ आदी उपस्थित होते.
शिल्पकार बाळकृष्ण पांचाळ यांचा सत्कार करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ऊन, पावसात शिल्प टिकेल का, अशी शंका व्यक्त केली. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी पवार यांना प्रत्युत्तर दिले. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जिवंतपणीदेखील अनेक वादळे अंगा-खांद्यावर झेलली. अनेक वादळांना टक्कर देऊनही त्यांचे विचार संपले नाहीत. तसाच हा पुतळादेखील मजबूत पायावर उभा आहे, असा टोला भुजबळ यांनी लगावला. यावर रायगड येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा संदर्भ देत अजित पवार यांनी सारवासारव केली. अशा घटना घडल्यानंतर काही जणांकडून राजकारण केले जाते. त्यामुळे पुतळे मजबूत असावेत, असा विचार आपण मांडला. दुसरा हेतू नव्हता,असे त्यांनी स्पष्ट केले.