नाशिक : गेल्या वर्षी ३ जुलै रोजी पायी हजयात्रेला प्रारंभ करणारे पंचेचाळीस वर्षीय मोहम्मद अली शहबाज सय्यद यांनी अनेक आव्हानांवर मात करून हजयात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली. मुंबई येथून परतीचा पायी प्रवास करत रविवारी रात्री वाडीवऱ्हे येथे मुक्काम करून ते सोमवारी (दि.१५) नाशिकला पोहोचले.
२०१९पासून अली यांनी पायी हजयात्रा करण्याचा निर्धार करत त्यादृष्टीने तयारीला प्रारंभ केला होता. गेल्या वर्षी ३ जुलै त्यांच्या पायी हजयात्रेच्या प्रवासाला प्रारंभ झाला. हुसेनी बाबा यांच्या प्रारंगणातून आशीर्वाद घेत त्यांनी यात्रा आरंभली होती. नाशिक येथून पायी दिल्ली गाठत त्यांनी पुढील मार्गक्रमण करत यात्रा पूर्ण केली. संपूर्ण वर्षभराची त्यांची ही तीर्थयात्रा होती. नाशिक नव्हे तर राज्यातून अन् देशातून अशाप्रकारे पायी हजयात्रेला करणारे ते एकमेव व्यक्ती असल्याचे सांगितले जात आहे.
अली यांनी कापले ८ हजार ६० किमी अंतर
इराण, इराक, कुवैतमार्गे त्यांनी पायी गाठले सौदी अरेबिया
दिवसभर चालणे, रात्री मुक्काम असे प्रवास सूत्र
मोहम्मद अली यांची सौदी अरेबियामधील मक्का-मदिना शहरात हजयात्रा यावर्षी बकरी ईददरम्यान पूर्ण झाली. तेथून ते मुंबईला विमानाने पोहोचले. मुंबईतून पुन्हा नाशिकपर्यंत त्यांनी पायी चालत प्रवास पूर्ण केला. शुक्रवारी (दि.१२) पायी चालण्यास सुरुवात केल्यानंतर रविवारी (दि.१४) वाडीवऱ्हे गावातील मशिदीत त्यांनी मुक्काम केला. शहरामधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दग्र्यातून पेंटरकाम करणाऱ्या मोहम्मद अली यांनी वर्षभराची हजयात्रा पूर्ण केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मेरीजवळील कॅनॉल रोडवर असलेल्या वसाहतीत राहणाऱ्या मोहम्मद अली सय्यद यांनी अतिशय जिद्दीने ही यात्रा अनेक अडचणींवर मात करत पूर्ण केली. ते साइन बोर्ड रंगविण्याचे काम करतात. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असलेल्या अली यांनी यापूर्वींंही २००३ मध्ये नाशिक येथून अजमेमधील ख्वाजा गरीब नवाज यांच्या दग्र्यापर्यंत सायकलवरून प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
मोहम्मद अली यांना पाकिस्तानने व्हिसा नाकारल्याने दिल्ली येथून त्यांनी पुढील प्रवासाचा मार्ग बदलला. दिल्लीतून इराणपर्यंत त्यांनी विमानाने प्रवास केला. इराणहून पुन्हा सौदी अरेबियापर्यंत पायी प्रवास पूर्ण करत त्यांनी यात्रा पूर्ण केली. दरम्यान, त्यांना आवश्यक त्या सर्व परवानग्या, पारपत्र व अन्य कागदपत्रांची पूर्तता करून देण्यासाठी त्यांचे भाऊ गुलाब सय्यद व मित्र सतीश जगताप यांनी मदत केली.