

सातपूर : पुढारी वृत्तसेवा
बनावट कागदपत्रे, खोटी ओळख आणि मृत व्यक्तीच्या नावाचा गैरवापर करून म्हाडाची सदनिका बळकावल्याचा धक्कादायक प्रकार सातपूरमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी संशयित राजू बडगुजर, आनंद भट्टड आणि राजेश विश्वकर्मा यांच्याविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठ दिवसांत राजू बडगुजरविरुद्ध दाखल झालेला हा दुसरा, तर आतापर्यंत हा तिसरा गुन्हा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी संगनमत करत फिर्यादीच्या मृत वडिलांच्या नावाचे मतदान ओळखपत्र तयार करून त्याच्या आधारे म्हाडाची सदनिका हस्तांतरित करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासकीय यंत्रणांच्या पडताळणी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
खोटी माहिती, बनावट नोंदी आणि खोट्या दस्तऐवजांच्या आधारे संबंधितांनी शासनाची दिशाभूल करत मालमत्ता बळकावण्याचा कट रचला. तक्रारीनंतर पोलिसांनी विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वीच राजू बडगुजर याच्यावर जळगावच्या व्यावसायिकास २२ लाख ५७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप झाला होता.
स्वस्तात प्लॉट मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट मालक उभा करणे, खोटे दस्तऐवज तयार करणे आणि लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला होता. त्या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यापूर्वी आडगाव पोलिस ठाण्यातही त्याच्याविरोधात गुन्हा नोंद आहे.
सातपूर, गंगापूर आणि आडगाव या तीन ठिकाणी समोर आलेल्या प्रकरणांमुळे नाशिकमध्ये सक्रिय असलेल्या कथित प्लॉटमाफियांच्या कारवायांबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता व्यवहार होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भाऊसाहेब दहिफळे करत आहेत.
बोगस प्लॉट किंवा घर खरेदी-विक्री व्यवहारांबाबत 66 कोणालाही माहिती अथवा तक्रार असल्यास त्यांनी सातपूर पोलिसांशी तातडीने संपर्क साधावा. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल
- प्रकाश अहिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सातपूर