

सटाणा (नाशिक) : नवे निरपूरचे पोलिसपाटील मुख्यालयी राहत नसल्याच्या कारणावरून त्यांच्याकडील कार्यभार काढून घेण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी महेश शेलार यांनी बुधवारी (दि.10) आदेश बजावला आहे.
नवे निरपूर येथील प्रतिभा पंकज सूर्यवंशी या पोलिसपाटील म्हणून कार्यरत होत्या. त्या मुख्यालयी राहत नसल्याबाबत तसेच त्यांचे कामकाज पती पाहत असल्याबाबत उपविभागीय अधिकार्यांकडे माजी सरपंच व ग्रामस्थांनी तक्रार केली होती. त्यानुसार उपविभागीय अधिकार्यांनी सटाणा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांकडून अहवाल मागविला. अहवालात सूर्यवंशी या मुख्यालयी राहत नसून पोलिसपाटील पदाचे कर्तव्य बजावत नसल्याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट झाली. त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी पोलिस निरीक्षकांच्या अहवालानुसार बुधवारी (दि.10) आदेश काढून सूर्यवंशी यांच्याकडील पोलिसपाटील पदाचे कामकाज काढून घेतले. या पदाचा अतिरिक्त कार्यभार खमताणे येथील पोलिसपाटील योगेश बागूल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत बागूल यांनी पोलिसपाटील पदाशी संबंधित सर्व कामकाज व कार्यभार सांभाळावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.