

सटाणा (नाशिक) : सुरेश बच्छाव
राजकीय प्रस्थापितांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीत धक्कादायक निकालाची प्रचिती आली. निवडणुकीत नवख्या उमेदवारांना सोबत घेत ऐनवेळी तयार झालेल्या पॅनलने तब्बल नऊ जागी विजयाची मुहूर्तमेढ रोवली, तर दोन परस्परविरोधी गटांनी ऐक्याची मोट बांधत निर्मिलेल्या पॅनलची घोडदौड अवघ्या सहा जागांवर रोखली गेली. निवडणुकीत मतदारांनी सहकार क्षेत्रातील प्रस्थापितांना सपशेल नाकारल्यामुळे निकालाची जिल्हाभर चर्चा होत आहे. आता बाजार समितीचा गाडा हाकण्याची जबाबदारी नवख्यांवर आली आहे.
येथील बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्याच्या मुद्द्यावर दोन मातब्बर परस्परविरोधी प्रस्थापित गट एकत्र आले. आपापल्या राजकीय क्षमतेनुसार संचालक संख्या ठरवून त्यांनी नावे निश्चिती केली. तथापि, यामध्ये स्थान न मिळालेल्या विद्यमान सभापतींनी त्याविरोधात दंड थोपटून ऐनवेळी नवगतांना सोबत घेत पॅनलनिर्मिती केली. विशेष म्हणजे वरकरणी प्रस्थापितांचे पॅनल अतिशय तगडे भासत होते. त्यांनी उमेदवारही अधिक दिले. परंतु मतदारांनी प्रस्थापितांविरोधात उभ्या ठाकलेल्यांना पाठबळ दिले आहे.
प्रस्थापितांचे पॅनल आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम होते तसेच नात्यागोत्याच्या बाबतही ते डोईजड होते. मात्र मतदारांनी प्रस्थापितांविरोधात शड्डू ठोकलेल्यांकडे बाजार समितीची सत्ता सोपवली. या निकालामुळे तालुक्याच्या राजकारणावरील लखमापूर, ब्राह्मणगाव गावांचा वरचष्मा कमी होऊन डांगसौंदाणे व सटाणा शहराचे राजकीय वजन वाढले आहे. या निकालामुळे आगामी काळात तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलण्याची चिन्हे आहेत.
तालुक्याच्या राजकारणात परस्पर विरोधात असलेले डॉ. विलास बच्छाव, राघोनाना अहिरे, नानाजी दळवी, पप्पूतात्या बच्छाव यांनी एकत्र येत शेतकरी विकास पॅनलची निर्मिती केली, तर विरोधात माजी सभापती संजय सोनवणे यांनी भाजपचे राहुल सोनवणे, शिवसेनेचे लालचंद सोनवणे, गजेंद्र चव्हाण, डॉ. प्रशांत सोनवणे, रवींद्र सोनवणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे केशव मांडवडे यांना बरोबर घेत सर्वसामान्य उमेदवारांचे यशवंत शेतकरी विकास पॅनल उभे केले होते. या पॅनलला पूर्ण उमेदवारही देता आले नसले, तरी त्यांचे मात्र नऊ उमेदवार निवडून आले, तर प्रस्थापित म्हणवणारे केवळ सहा शिलेदार विजयपथावर पोहोचले.