

सप्तशृंगगड (नाशिक) : श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर श्री सप्तशृंग निवासिनीदेवी ट्रस्टतर्फे महाशिवरात्री उत्सव - 2025 आयोजित करण्यात आला आहे. त्या अंतर्गत बुधवारी (दि. 26) सायंकाळी 7 वाजता भजनसंध्या हा कार्यक्रम होणार आहे.
महाशिवरात्रीनिमित्त सालाबाद-प्रमाणे रात्री 9 वाजता श्री भगवतीची विशेष पंचामृत महापूजा होईल. दरम्यान, भक्तनिवास सुविधेतील कुदळे निवास या इमारतीचा पुनर्रलोकार्पण सोहळा जिल्हा न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते होणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश बाबासाहेब वाघ यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच तहसीलदार रोहिदास वारुळे, अॅड. ललित निकम, अॅड. दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे व भूषणराज तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा होणार आहे. धार्मिक उपक्रमात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. महाशिवरात्रीनिमित्त उत्तर महाराष्ट्रासह राज्यातून भाविकांची गडावर गर्दी होण्याची शक्यता आहे. बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.