

देवळा, पुढारी वृत्तसेवा : चैत्र उत्सवानिमित्त सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी प्रवास करणाऱ्या एका वृद्ध भाविकाचा अंघोळी दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना विठेवाडी (ता. देवळा) येथे गुरुवारी घडली. कैलास बुधा सोनवणे (वय ६०, रा. सांगवी, ता. शिरपूर, जि. धुळे) असे निधन झालेल्या भाविकाचे नाव आहे. (Nashik Saptashrungi News)
दरवर्षीप्रमाणे यंदाही धुळे, जळगाव, नंदुरबार, शिरपूर, दोंडाईचा व शिंदखेडा परिसरातून हजारो भाविक सप्तशृंगी गडाच्या दर्शनासाठी पायी प्रवास करतात. कैलास सोनवणे हेही अशाच पायी यात्रेला निघाले होते. मात्र, विठेवाडी परिसरातील भालचंद्र निकम यांच्या शेतात थांबून त्यांनी पाण्याची व्यवस्था पाहून अंघोळ केली. याच दरम्यान सकाळी सुमारे ११ वाजता त्यांना चक्कर आली आणि ते अंघोळीच्या ठिकाणीच कोसळले. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीवरून मृत्यूचे नेमके कारण उष्माघात किंवा हृदयविकाराचा झटका असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप सोनवणे, पोलीस कर्मचारी सुरेश कोरडे व श्रावण शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ मृताच्या नातेवाईकांना फोनद्वारे माहिती दिली असून अधिक तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे यात्रेतील भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सध्या उन्हाचा प्रचंड पारा लक्षात घेता पायी प्रवास करणाऱ्या भाविकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचा सल्लाही आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे.