नाशिक : महापालिकेच्या समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांगांसाठी तसेच महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे तब्बल १,५३१ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर लवकरच अर्थसहाय्य जमा होणार आहे.
दिव्यांग तसेच महिला कल्याणाच्या योजनांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रत्येकी पाच टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. महिला बालकल्याण विभागामार्फत विधवा, निराधार, घटस्फोटीत महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य देण्याचे सात प्रकरणे मंजूर करण्यात आली असून, प्रत्येक लाभार्थ्यास एक लाख रुपये अर्थसहाय्य अदा केले जाणार आहे. विधवा, घटस्फोटीत, निराधार महिलांच्या मुलांना पहिली ते कॉलेजपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी २३८ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी २४ लाख ४० हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे. त्याचबरोबर समाजकल्याण विभागांतर्गत प्रौढ दिव्यांगांसाठी राबविण्यात येत असलेल्या अर्थसहाय्य योजनेतील ८८१ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्यासाठी २० लाख ७३ हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. योजना क्रमांक ५ मध्ये १६८ अर्ज मंजूर करण्यात आले असून, त्यासाठी प्रत्येकी २० हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. यामुळे दिव्यांगांना शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांना पहिली ते कॉलेजपर्यंतच्या शिक्षणासाठी सुमारे चार ते १२ हजारांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. योजना क्रमांक ९ मध्ये २०७ प्रकरणे मंजूर करण्यात येऊन त्यासाठी मतिमंद व गतिमंद बालकांच्या पालन पोषणाकरता दरमहा तीन हजार अदा केले जाते. त्यासाठी महिन्याला सहा लाख २१ हजार रुपये खर्च केला जाणार आहे. संबंधित लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यात येत्या काही दिवसांत त्यांना मंजूर झालेले अर्थसहाय्य वर्ग केले जाणार आहे.
दीड हजार दिव्यांग तसेच महिला लाभार्थ्यांची प्रकरणे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंजूर करण्यात आली आहेत. लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी जमा केला जाणार आहे.
नितीन नेर, उपायुक्त, समाजकल्याण विभाग, नाशिक.