

नाशिक : रॅश ड्रायव्हिंगसह सिग्नल मोडणाऱ्या बसचालकांवर कारवाई करण्याचा निर्णय सिटीलिंक प्रशासनाने घेतला आहे. यासाठी शहरातील 48 सिग्नलवरील सीसीटीव्ही फुटेज सिटीलिंकने पोलिस प्रशासनाकडून मागविले आहे. यासाठी पोलिस आयुक्तांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या माध्यमातून शहर, परिसरात 'सिटीलिंक-कनेक्टिंग नाशिक' बससेवा चालविली जाते. सद्यस्थितीत सिटीलिंकमार्फत 61 मार्गांवर 250 बसेसची सुविधा प्रवाशांना पुरविण्यात येते. यामध्ये नाशिक शहराबरोबरच लगतच्या 20 किमी परिघातील ग्रामीण भागांतही बससेवा दिली जाते; परंतु, सिटीलिंकच्या काही बसचालकांकडून रॅश ड्रायव्हिंग होत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी आहेत.
वाहकांकडून नियमांचे पालन केले जात नसून ओव्हरस्पीड गाड्या चालविल्या जातात. याबाबत मुंबईत बेस्ट बसच्या अपघातानंतर सिटीलिंकने दक्षात घेऊन चालकांना प्रशिक्षण दिले जात आहे. परंतु, तरीही चालकांकडून रॅश ड्रायव्हिंग केले जात असून, सिग्नल तोडण्याचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सिटीलिंक व्यवस्थापनाने आता चालकांवरील कारवाईसाठी सिग्नलवरील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून सिग्नलवरील फुटेज देण्याची विनंती केली आहे. या फुटेजची तपासणी होऊन संबंधित दोषी बसचालकांवर कारवाई केली जाणार आहे.
केंद्र सरकारने सार्वजनिक वाहतुकीसाठी असलेल्या वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित केली आहे. सिटीलिंकच्या गाड्यांसाठी शहरी भागात ६० किलोमीटर प्रतितास, तर ग्रामीण भागात ९० किलोमीटर प्रतितासची मर्यादा घालून दिली आहे.
सिटीलिंकच्या बसचालकांविरोधात रॅश ड्रायव्हिंग, सिग्नल तोडणे आदी तक्रारी आहेत. पोलिसांकडून सिग्नलवरील सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले असून त्याची तपासणी करून संबंधित दोषी बसचालकांवर कारवाई केली जाणार आहे.
प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त, नाशिक महापालिका.