

नाशिक : वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी शहर वाहतूक पोलिसांतर्फे बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्याअंतर्गत जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत शहरात एक लाख २० हजार २१७ बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. ‘ई चलान’मार्फत केलेल्या कारवाईतून या चालकांना नऊ कोटी २३ लाख ३८ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यापैकी अवघे एक कोटी पाच लाख ५० हजार ५५० रुपयांचा दंड वसूल झाला असून, उर्वरीत ८८ टक्के दंड वसुलीचे आव्हान वाहतूक शाखेसमोर आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने अपघात व अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत चालले आहे. चालू वर्षात शहरात नोव्हेंबरअखेरपर्यंत ४५८ अपघात झाले असून त्यात १५९ जणांचा मृत्यू झाला. तर ४२२ जण जखमी झालेत. हे प्रमाण कमी होण्यासाठी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन क्रमप्राप्त आहे. त्यादृष्टीने पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, वाहतूक शाखेचे उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाईसह नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत प्रबोधन केले जात आहे.
दरम्यान, वाहतूक पोलिसांनी यंदा नोव्हेंबर अखेरपर्यंत १ लाख २० हजार २१७ बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यापैकी १२ हजार ४८१ चालकांनी एक कोटी ५ लाख ५० हजार ५५० रुपयांचा दंड भरला आहे. तर एक लाख ७ हजार ७३६ चालकांकडील आठ कोटी १७ लाख ८७ हजार ८५० रुपयांची दंड वसुली अद्याप प्रलंबित आहे.
ई चलान मार्फत दंड केल्यानंतर दंड वसुलीसाठी वाहतूक पोलिस संबंधित वाहन चालकांना दंड भरण्यासाठी नोटीस पाठवतात. तसेच लोकअदालतीतही त्यांचे प्रकरण पाठवले जाते. त्यानुसार तेथे दंड वसुली केली जाते. तसेच काही वाहन चालकांना एकापेक्षा जास्त वेळेस दंड आकारल्यास त्यांचे वाहन ताब्यात घेऊन दंड वसुलीसाठी वाहतूक पोलिस प्रयत्नशील असतात.