Nashik Road Railway Station | नाशिकरोड रेल्वे स्थानकावर "शांती आलय"
नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील फलाट क्र. 1 वर महिलांसाठी विशेषतः सुसज्ज व सुरक्षित प्रतीक्षालय “शांती आलय” सुविधा सुरु करण्यात आली आहे. महिलांच्या सन्मान, सुरक्षितता व आरामाला प्राधान्य देत हा उपक्रम नॉन-फेअर रेव्हेन्यू योजनेअंतर्गत राबविण्यात आला आहे.
जुन्या प्रतीक्षालयाचे रूपांतर करून “शांती आलय” तयार करण्यात आले आहे, जे फक्त महिलांसाठी राखीव असून आकर्षक गुलाबी रंगसंगती, स्वच्छता व आधुनिक सुविधा यांचे संगम आहे. सुमारे ९० चौरस मीटर क्षेत्रफळात ही सुविधा उभारण्यात आली आहे. आरामदायक व शांत वातावरण असून तेथे चहा/कॉफी व रेल नीर पाण्याच्या बाटल्यांसाठी स्वयंसेवी आहेत. तसेच प्रवाशांसाठी सहाय्य करणारा ट्रॅव्हल डेस्क आहे. तेथेच * मासिके, वर्तमानपत्रे, सॅनिटरी नॅपकिन्स, टॉयलेटरी आणि ओटीसी औषधे विक्री सुविधा आहे. प्रौढ महिलेसाठी पहिल्या तासासाठी २० रुपये आणि नंतर प्रत्येक तासासाठी १५ रुपये दर आकारले जाणार आहे. ही संकल्पना भविष्यात भुसावळ विभागातील इतर प्रमुख स्थानकांवरही राबवली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
स्वावलंबी व प्रवाशी-केंद्रित सेवा सुधारणा: नॉन-फेअर रेव्हेन्यू उपक्रमां माध्यमातून प्रवाशांच्या सुविधांचा विकास आणि उत्पन्न निर्मितीचा योग्य समन्वय साधत भुसावळ विभागाने रेल्वेसेवेत एक नवा आदर्श घालून दिला आहे. व स्त्रियांनीही या रेल्वेच्या योजनेचे स्वागत केले आहे.
प्रमुख वैशिष्टये अशी...
आरामदायक आसनव्यवस्था: एअरपोर्ट शैलीतील स्टेनलेस स्टील गाद्यांसह आसने
नूतनीकरण केलेले अंतर्गत सजावट: लाईटिंग, अतिरिक्त फॅन्स व वातानुकूलन यंत्रणा
स्वतंत्र शौचालय सुविधा: अत्याधुनिक, स्वच्छ व नियमित देखभाल असलेले स्वच्छतागृह.
'वूलू लाउंज' ला रेल्वेचा पर्याय
पूर्वी वूलू पाउडर रूम लाउंज या खासगी भागीदारी प्रस्तावाच्या माध्यमातून ही संकल्पना राबविण्याचा विचार होता. मात्र चर्चा अपूर्ण राहिल्यामुळे भुसावळ विभागाने स्वतः पुढाकार घेऊन “शांती आलय” साकारले. ही सुविधा म्हणजे भारतीय रेल्वेने महिलांसाठी तयार केलेली आधुनिक, सुरक्षित आणि सुसज्ज प्रतीक्षागृहाची नवीन व्याख्या आहे.

