

नाशिकरोड : रेल्वे प्रवासादरम्यान वाट चुकलेल्या, घरातून पळून आलेल्या अथवा कौटुंबिक कलहातून रेल्वे स्थानकावर आलेल्या बालकांना कुटुंबाचा आधार मिळवून देण्याचे काम नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी केले आहे. जानेवारीपासून आत्तापर्यंत रेल्वे पोलिसांनी हरवलेल्या २३ मुलांचा शोध घेत त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे.
रेल्वे स्थानकावर अनेकदा बेवारस आढळणारी मुले मानसिक, शारीरिकदृष्ट्या असुरक्षित असतात. अशा मुलांची तत्काळ दखल घेत त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे, समुपदेशन करणे व नातेवाइकांचा शोध घेणे ही जबाबदारी रेल्वे पोलिसांकडून पार पाडली जाते. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आढळलेल्या २३ मुलांना योग्य प्रक्रिया पूर्ण करत पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. याशिवाय तीन पुरुष व चार महिलांनाही शोधून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घडवून देण्यात आली. वर्षभरात रेल्वेस्थानक परिसरात २४१ गुन्हे दाखल झाले आहे. त्यापैकी ११९ गुन्हे उघडकीस आणण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. यात १३० आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका व्यक्तीविरोधात तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सुमारे ६५ लाख रुपयांच्या चोरीस गेलेल्या वस्तू मालकांच्या स्वाधीन करण्यात आल्या. रेल्वे पोलिसांची ही कामगिरी समाजात सुरक्षिततेचा विश्वास वाढवणारी ठरली आहे.
या झाल्या कारवाया
स्वाधीन केलेली मुले - २३
ट्रॅक ओलांडणे - १६४४ कारवाई
नियमभंग कारवाई - १६४४
पकडलेले चोर - ८७
एकूण गुन्हे नोंद - २४१
गुन्ह्यांची उकल - १३०
मुद्देमाल परत - ६५ लाख
रेल्वे स्थानकावर काही संशयित मुली आढळल्यास आम्ही त्यांची चौकशी करतो. चौकशी दरम्यान वेगवेगळ्या कारणांनी मुली घरातून निघून आलेल्या असतात. त्यांना विश्वासात घेत घरच्यांशी संपर्क करतो. मुलींचे काउन्सलिंग करत कुटुंबीयांकडे सुपूर्द करतो.
आशा मोरे, हवालदार, नाशिकरोड रेल्वे