Dwarka-Nashik Road | द्वारका-नाशिक रोड रस्ता रुंदीकरणासाठी २९० कोटी

महापालिकेकडून 'न्हाई'ला प्रस्ताव सादर; लवकरच मंजुरी शक्य
Dwarka-Nashik Road
Dwarka-Nashik Road
Published on
Updated on

नाशिक : द्वारका ते नाशिकरोड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच निकाली लागणार आहे. या सुमारे सात किलोमीटर लांबींच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २९० कोटींचा प्रस्ताव नाशिक महापालिकेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात 'न्हाई'ला सादर केला.

महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी ही माहिती दिली. नाशिकरोड हे नाशिकचे प्रवेशद्वार मानले जाते. नाशिककडे येणाऱ्या अन्य रस्त्यांच्या तुलनेत नाशिक-पुणे रोडवरील नाशिकरोड ते द्वारका या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. पुण्याहून नाशिककडे येणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे या रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावतो आहे. विशेषतः दत्तमंदिर, आंबेडकरनगर, काठेगल्ली सिग्नल या भागांत मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी असते. या भागांतील सिग्नल पार करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते.

प्रस्तावित मेट्रो निओ याच मार्गावरून जाणार असल्याने नागपूरच्या धर्तीवर द्वारका ते दत्तमंदिर या दरम्यान डबलडेकर उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता. मेट्रो निओचा प्रकल्प आता डब्यात गेला आहे. त्यामुळे डबलडेकर उड्डाणपुलाच्या प्रस्तावावर देखील फुली मारण्यात आली. त्याऐवजी या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची योजना पुढे आली आहे. त्यासाठी सुमारे २९० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महापालिकेने 'न्हाई'ला सादर केला.

डबलडेकर पूल रद्द

मेट्रो निओचा भाग म्हणून द्वारका ते दत्तमंदिर दरम्यान डबलडेकर उड्डाणपूल उभारण्याचे प्रस्तावित होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले होते. परंतु अद्याप पुलाचे काम सुरू होऊ शकलेले नाही. आता या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार असल्याने डबलडेकर उड्डाणपुलाचा प्रस्तावही बासणात गेला आहे.

द्वारका ते नाशिकरोड (सिन्नर फाटा) दरम्यान रस्ता रुंदीकरणासाठी 'न्हाई'कडे २९० कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळणार असून, रस्ते कामाला सुरुवात केली जाईल.

-मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news