

दिंडोरी : नाशिक-अकराळे फाटा रस्त्यावरील ढकांबे टोल नाक्याजवळ गुरुवारी (दि.१६) सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. रस्ते रुंदीकरणाच्या कामात ररस्त्यावर पाणी मारणाऱ्या टँकरने दिलेल्या धडकेत एका शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला. कमल देविदास बोडके (वय ५५) या महिलेचे नाव आहे. ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मार्गावर सध्या रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू आहे. सायंकाळच्या सुमारास धूळ उडू नये, म्हणून रस्त्यावर पाणी मारण्याचे काम टँकरद्वारे सुरू होते. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने टँकरने कमल बोडके यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी प्रशासन व ठेकेदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे रस्ते कामांदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांकडे होणारे दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.