

देवळाली कॅम्प : सिंहस्थानिमित्त नाशिक शहराभोवती ६६ किलोमीटरचा रिंगरोड उभारला जाणार आहे. जमीन संपादनावेळी कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. संपादित केल्या जाणाऱ्या शेतजमिनीवरील पिके, घरे, फळझाडे वाची माहिती घेऊन संबंधितांना योग्य मोबदला दिला जाईल. कुणीही भयभीत होऊ नये आणि जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आ. सरोज आहिरे यांनी केले.
रिंगरोडमधील बाधित शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी प्रशासनातर्फे विहितगाव सहारा लॉन्स येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक, महेश जमदाडे, प्रांत अधिकारी अर्पिता ठुबे, भूसंपादन प्रक्रियेतील संबंधित अधिकारी उपस्थित होते. या रिंगरोडबाबतची सविस्तर माहिती नकाशाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांना दिली. त्यात पाथर्डी, पिंपळगाव खांब, वडनेर दुमाला व रेल्वेच्या पूर्व भागातील रिंगरोड भागातील शेतकऱ्यांची घरे जाणार आहेत. प्रामुख्याने अरिंगळे मळ्यातील ९९ वर्षांच्या कराराने घेतलेल्या भूखंडावर घरे बांधलेले व गुंठेवारीवर जागा घेऊन इमले उभारलेले नागरिक व महिला मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.
जमिनीचा मोबदला कशा प्रकारे मिळणार? रस्ता गेलेल्या जमिनीच्या दोन्ही बाजूला शेतीचे तुकडे उरले त्याचे काय करणार? त्याचाही मोबदला शेतकऱ्यांना देणार का? ९९ वर्षांच्या कराराने घेतलेल्या जागेचे पैसे कुणाला मिळणार? कारण सातबारा उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव असेल पण जागेवर प्रत्यक्ष कब्जा असलेल्यांची नावे नसतील. त्यांना इतरत्र जमीन देणार का? महापालिका क्षेत्रातील या अल्पभूधारक व रहिवाशांची व्यवस्था सरकार करणार का? अशा अनेक समस्या सर्वानी अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. त्यावर अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती देऊन भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक यांच्याकडे आपल्या मागण्यांसाठी अर्ज करावे, असेही सुचविण्यात आले.
कायद्यातील तरतुदीनुसार सर्वांना न्याय दिला जाईल, असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अद्याप शासकीय कामकाज सुरू झालेले नाही. प्रत्यक्ष सर्व्हेच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जातीने उपस्थित राहून माहिती द्यावी. जो रहिवासी आहे त्यानेही आपल्या घरासंबंधी सविस्तर सांगावे. त्याची नोंद करून द्यावी आदीबाबत या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले. गुरुवारी गॅझेट प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व्हे नंबरवरून रस्ता कुठून जातो याची शेतकऱ्यांना कल्पना येईल. त्याची माहिती गावच्या तलाठ्यांकडेही नकाशावरून शेतकऱ्यांना मिळेल. हा रस्ता फारसा उंच होणार नाही, त्यावर टोल राहणार नाही. तीन भागांत तो तयार केला जाणार आहे. गावाजवळ सर्व्हिस रोडची सुविधा राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी स्थानिक नेते निवृत्ती अरिंगळे, प्रभाकर पाळदे, विक्रम कोठुळे, गणेश खर्जुल, सुरेश नेहे आदींनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी सहकार्य केले.
विहितगाव वडनेर रस्त्याबाबत बैठक
विहितगाव ते वडनेरदरम्यान रस्ता रुंदीकरणात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने त्या संदर्भात शासकीय अधिकारी आणि आमदार सरोज आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विहितगाव ते वडनेर गावापर्यंत होणाऱ्या रस्ता रुंदीकरणात दोन्ही बाजूंनी समांतर अशा अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. बाधित शेतकऱ्यांना बाजारमूल्याच्या दुप्पट टीडीआर मिळावा, नुकसानभरपाई मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या असता ग्रीन झोन, यलो झोन, रेडी रेकनरनुसार मोबदला दिला जाईल. झाडे, घरे, विहिरी यांचा मोबदला दिला जाणार नाही. मात्र रिक्त असलेल्या जागेचा मोबदला दिला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर बाधित शेतकऱ्यांना जोपर्यंत मोबदला दिला जाणार नाही तोपर्यंत रस्ता होऊ देणार नाही तसेच वाढीव मोबदल्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे आमदार सरोज आहिरे यांनी सांगितले. यावेळी शहर अभियंता संजय अग्रवाल, सहायक संचालक नगररचना कल्पेश पाटील, उपअभियंता दप्तरे, भूमिअभिलेख अधिकारी बिपीन काजळे, शाखा अभियंता प्रवीण थोरात, बांधकाम अभियंता सुरेश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
कुणीही भयभीत होऊ नका : अहिरे
ग्रीन झोन व यलो बेल्ट मोबदल्यात असलेली तफावत आणि रेडीरेकनरमधील दरासंबंधीच्या तक्रारी व इतरही बाबींच्या तक्रारी आपण थेट मुख्यमंत्र्यांकडे व स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडणार आहोत. त्याबाबतचे किमतीतील पैशांसंबंधी शेतकऱ्यांना व बाधित व्यक्तींना न्याय मिळण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल. तसेच कोणाची घरे जात असतील तर त्यांच्या निवाऱ्याची समस्या सोडविण्याचा शासनाकडून प्रयत्न केला जाईल. कुणीही भयभीत होऊ नये व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आ. सरोज आहिरे यांनी केले.