

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रिंगरोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यातच सुरू केलेले ठिय्या आंदोलन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलनासाठी निघालेल्या शेतकऱ्यांची पोलिसांनी धरपकड केल्यानंतर शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यातच ठिय्या दिला होता. तब्बल १६ तासांनंतर उद्योगमंत्र्यांनी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेत, मंत्रालयात 'फास्ट ट्रॅक' पद्धतीने विशेष बैठक घेऊन प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
शुक्रवारी (दि.३) सकाळी ९ वाजता शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलनासाठी नाशिकहून निघाले असता, मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी रद्द केल्याची माहिती नाशिक पोलिसांना दिल्यानंतर आंदोलकांना मुंबईत जाण्यापासून रोखण्यात आले होते. नाशिक पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेत सरकारवाडा पोलिस ठाणेमागील पोलिस वसाहतीतील बेरेक ६ मध्ये ठेवले होते. यावेळी शेतकऱ्यांनी ठाम भूमिका घेत, शासनाकडून जबाबदार मंत्री येऊन चर्चा करेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे सरकारवाडा परिसरात तब्बल १६ तास आंदोलन सुरू राहिले. आंदोलनाची दखल घेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकारी तसेच मंत्री गिरीश महाजन आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली.
आंदोलनात महिला शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता. महिला आणि पुरुष शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे शासनाला तातडीने दखल घ्यावी लागल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत, नगरसेवक निवृत्ती इंगोले, आंदोलनाचे नेतृत्व करीत असलेले करण गायकर, शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, वैभव दळवी, सुभाष गायकर, भारत पिंगळे, संगीता सूर्यवंशी, सविता वाघ आदी उपस्थित होते.
मंत्री महाजनांसोबत आज बैठक
मंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर भाजपचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण तसेच मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक संदीप जाधव यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन रविवारी (दि.५) मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक घेऊन मंत्रालयातील बैठकीची तारीख आणि वेळ निश्चित करण्यात येईल, अशी माहिती दिली.
रिंगरोडबाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णयासाठी मंत्रालयात 'फास्ट ट्रॅक' पद्धतीने बैठक घेण्यात येईल. संबंधित मंत्री, प्रशासन आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत चर्चा करून मार्ग काढला जाईल. अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
- उदय सामंत, उद्योगमंत्री
हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असून, शासनाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून आंदोलन स्थगित केले आहे. मंत्रालयातील बैठकीत सर्व प्रश्नांवर कायमस्वरूपी आणि न्याय्य तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे.
- करण गायकर, संस्थापक अध्यक्ष, छावा क्रांतिवीर सेना