

त्र्यंबकेश्वर : चार दिवसांपासून सातत्याने परतीच्या पाऊस काेसळत आहे. याचा सर्वाधिक फटका हा सोंगणीला आलेल्या हळीव भात पिकाला बसला आहे. कापणीला आलेले हळे भात धुवाधार कोसळणाऱ्या पावसाने भूईसपाट झाले आहे. याचा मोठा फटका हरसूल, ठाणापाडा भागात बसला आहे. गत आठवड्यात परिपक्व झालेल्या भाताची सोंगणी सुरू झाली आणि पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कापणी झालेल्या भाताचा चिखल झाला आहे. कुजलेले, सडलेले पीक आता जनावरांना चारा म्हणूनदेखील उपयोगाचे राहिलेले नाही.
सोंगणी हंगामाच्या पहिल्या टप्प्यात हळीव भात काढणीला येतो. चार महिने आर्थिक चणचण सहन करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्याला हळीव भातांच्या माध्यमातून दसरा-दिवाळी सणाला दोन पैसे हाती येतात. यावर्षी मात्र या शेतकऱ्यांवर आकाश कोसळले आहे. नुकसानग्रस्तांचे शासकीय मदतीकडे लक्ष लागले आहे. मात्र, सरकारी यंत्रणा निवडणूकपूर्व नियोजनात व्यग्र असल्याने पंचनाम्यांना मुहूर्त लागलेला नाही.
तालुक्यातील बहातांश जमीन खडी बरड आहे. या जमिनीत कमी कालवाधीत येणारे म्हणजेच हळीव वाणाचे भात पीक घेतले जाते. या भाताला कमी भाव मिळत असतो. मात्र ९० दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत येणारे पीक म्हणून त्याची निवड करावी लागते. बाजारात मुरमुरा लाही तयार करण्यासाठी त्याची खरेदी होत असते. भाताला सर्वसाधारण मिळणाऱ्या बाजारभावापेक्षा निम्मी किंमत मिळत असल्याने शेतकऱ्याला फारसे परवडत नाही. तरी अपरिहार्यता म्हणून शेकडो हेक्टरवर हळे वाणाच्या भाताची लागण होते. ते या पावसाने हिरावले गेले आहे.
शासनाने तातडीने पंचनामे करावेत आणि रोखीची मदत द्यावी. सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हाताशी असलेले पीक पूर्णपणे पाण्यात गेले आहे. याचा गांभीर्याने विचार करावा.
मिथुन राऊत, युवा शिवसेना, हरसूल