

नाशिक : विविध जलशुद्धीकरण केंद्रे तसेच बूस्टर पंपिंग स्टेशन येथे दुरुस्तीविषयक कामांसाठी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग तसेच स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून येत्या शनिवारी (दि. २१) शटडाउन घेतला जाणार आहे.
विविध दुरुस्तीविषयक कामांमुळे शनिवारी (दि. २१) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी (दि. २२)देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
महापालिकेचे विविध जलशुद्धीकरण केंद्र व बूस्टर पंपिंग स्टेशन येथे नाशिक स्मार्ट सिटी कंपनी येथे विविध कामे केली जात आहेत. स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरातील जलशुद्धीकरण केंद्रे येथे नवीन व्हॉल्व्ह व फ्लोमीटर्स बसविण्याची कामे हाती घेतली जाणार आहेत. तसेच काही ठिकाणी जलवाहिनी कामांकरिता स्मार्ट सिटीने शनिवारी शटडाउनची मागणी केली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत शटडाउन घेतले जाणार असून, त्यामुळे त्या दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच रविवारी सकाळचा पाणीपुरवठादेखील कमी दाबाने होणार आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.