नाशिक : महापालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती असल्याची बनावट जाहीरात सोशल मिडियाद्वारे पसरवून बेरोजगारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या सतर्कतेमुळे बुधवारी (दि. १८) टळला. सदर जाहीरात वाचून अनेक बेरोजगार महापालिका आणि जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जमा झाले होते. अशाप्रकारची कोणतीही भरती नसल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागात विशेष तज्ञांसह डॉक्टरांची सध्या १८९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत ६५ डॉक्टर कार्यरत असून, तब्बल १२४ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. नर्स, आया, औषधनिर्माता आदी पदही रिक्त आहेत. त्यामुळे पालिकेच्या वैद्यकीय विभागावरील ताण वाढला आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाने ३७ डॉक्टरांसह १२७ जणांची मानधनावर भरती करण्याचा निर्णय घेत, त्यासाठी आयुक्तांकडे प्रस्ताव ठेवला आहे. महापालिकेकडून या भरतीबाबत जाहीरात प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू असतांनाच, कोणीतरी खोडसाळपणा करत, भरतीची बनावट जाहीरात सोशल मिडियाद्वारे पसरविली. सदर जाहिरातीवर २ जुलै २०२४ हा दिनांक नमूद करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांतील सिवील केअर सेंटरमध्ये वॉर्ड बॉय, एएनएम, जीएनएम, मॅनेजमेंट हेल्पर, ड्रायव्हिंग, सेक्युरीटी पदासाठी थेट भरती बुधवारी (दि. १८) सकाळी १०.३० वाजता जिल्हा रुग्णालयात होणार असल्याचे या जाहिरातीत म्हटले होते. सदरची पदे ही तीन महिन्यासाठी भरण्यासह तीन महिन्यांनंतर त्यांना शासन सेवेत कायम केले जाईल असा दावा या जाहिरातीत करण्यात आला होता.
सोशल मिडीयावर जाहिरात प्रसारीत झाल्यानंतर इच्छूकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मात्र अशी कोणतीही भरती नसल्याचे जिल्हा रुग्णालयाने स्पष्ट केल्यानंतर या इच्छूकांनी लोकप्रतिनिधींसोबत संपर्क साधत, महापालिकेकडे विचारणा केली. परंतु, पालिकेने अशी कोणतीही भरती आमच्याकडे नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर इच्छूकांच्या फसवणुकीसाठी ही खोटी जाहीरात तयार करून पसरविण्यात आल्याचे समोर आले.
बनावट जाहीरात अशोक स्तंभाचा वापर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. पालिकेचे आयुक्त डॉ.अशोक करंजकर असतांना, या बनावट जाहिुरातीत माजी आयुक्त कैलास जाधव यांची स्वाक्षरी आहे. तर वैद्यकीय विभागाचा आदेश असतांना, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांची स्वाक्षरी वापरण्यात आली आहे. त्यामुळे हा सगळा आदेशच बनावट असून त्याची गंभीर दखल वैद्यकीय विभागाने घेतली आहे. याबाबत पोलिसात तक्रारही दिली जाणार आहे
कोणीतरी खोडसाळपणे महापालिकेच्या नावाने बनावट आदेश तयार करून उमेदवारांच्या फसवणूकीच्या उद्देशाने सोशल मिडियावर सदर जाहीरात प्रसारीत केली. अशाप्रकारची कोणतीही भरती नाही. याबाबत पोलिसात तक्रार केली जाणार आहे.
डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.