जून व जुलै महिन्यात जेमतेम हजेरी लावलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात दोन्ही महिन्यांचा बॅकलॉग भरून काढला. वरुणराजाच्या कृपावृष्टीमुळे विभागात वार्षिक सरासरीच्या ९७ टक्के पर्जन्याची नोंद झाली आहे. तब्बल ३४ तालुक्यांनी सरासरी ओलांडली असून, विभागात इगतपुरीत निच्चांकी ५४ टक्के पाऊस पडला.
पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक १५३ टक्के पर्जन्य
श्रीगाेंद्यामध्ये १४९ टक्के पावसाची नोंद
नाशिक जिल्ह्यात दिंडोरीत १३५ टक्के नोंद
९० ते १०० टक्क्यांमध्ये पर्जन्य झालेले ११ तालुके
विभागातील बहुतांश धरणांमधील विसर्ग कायम
दुष्काळाने हाेरपळलेल्या नाशिक विभागात चांगल्या पर्जन्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मान्सून सरासरी गाठेल असेही भाकीत वर्तविले गेले. परंतु, पहिल्या दोन महिन्यांत अपेक्षित पर्जन्य न झाल्याने जनतेच्या चिंतेत भर पडली. पण ऑगस्ट महिन्यात विभागात पावसाने धुवाधार बॅटिंग केली. काही तालुक्यांत कमी कालावधीत अधिकच्या पावसाची नोंद झाली. धरणे काठोकाठ भरली असून, नद्या-नालेदेखील दुथडी भरून वाहत आहेत.
नाशिक विभागाची पावसाची वार्षिक सरासरी ७०७ मिमी आहे. सद्यस्थितीत सरासरीच्या ९७ टक्के म्हणजेच ६८१ मिमी पाऊस पडला आहे. विभागात नगर जिल्ह्यात सर्वाधिक १२० टक्के पर्जन्य झाले आहे. या यादीत नाशिक तळाला असून, जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ८४ टक्के पाऊस झाला आहे. विभागातील ५४ पैकी ३४ म्हणजे ६३ टक्के तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. अकरा तालुक्यांत ९० ते ९९ टक्के, आठ तालुक्यांत ७० ते ९० टक्के तर एकमेव इगतपुरीत ७० टक्क्यांहून कमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मान्सूनचा अद्यापही पाऊण महिना शिल्लक आहे. यंदा आठवडाभर तो लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यंदाची जलचिंता दूर झाली आहे.
यंदा वरुणराजाच्या कृपावृष्टीमुळे विभागातील धरण ७८ टक्के भरली आहेत. विभागात मोठी, मध्यम व लहान मिळून एकुण ५३७ धरणे आहेत. या धरणांची एकुण साठवण क्षमता सहा हजार ८११ दलघमी इतकी आहे. आजमितीस धरणांमध्ये पाच हजार ४३० दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. गंगापूर, दारणा, मुकणे, पालखेड, गिरणा, हतनूर, भंडारदार, मुळा यासारखी मोठी धरणे काठोकाठ भरली आहेत. गतवर्षी याच कालावधीत विभागातील प्रकल्पांमध्ये केवळ ६२.१५ टक्के पाणीसाठा होता.