

नाशिक : गेल्या २५ ऑक्टोबरपासून नाशिक जिल्ह्यात बरसत असलेला अवकाळी पाऊस शनिवारी (दि.१) देखील हलक्या सरींसह शहरात बसरला. दिवसभरात तब्बल ३.२ मी. मि. पावसाची नोंद झाली. ढगाळ वातावरणामुळे दिवसभरात क्वचितच सूर्यदर्शन झाले. दरम्यान, हवामान विभागाने २ नोव्हेंबरपर्यंत नाशिकला 'यलो अलर्ट' दिला असून, रविवारी (दि.२) देखील अवकाळी पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.
पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले असून, आता अवकाळी पाऊस हातातोंडाशी आलेला उरलेला घासही हिसकावून घेत असल्याची स्थिती आहे. पावसाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मोठे नुकसान केले आहे. पुढील काही दिवस अवकाळीचा कहर कायम राहणार असल्याने, शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने शहरातील खड्डे आणखीनच खोल केले आहेत. अतिवृष्टीमुळे शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले होते. पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने रस्त्यांची खडी व मुरूम टाकून डागडूजी केली. मात्र, अवकाळीने पुन्हा ते खड्डे मोकळे केल्याने, नाशिककरांना खड्ड्यांमधून वाट शोधताना कसरत करावी लागत आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री पावसाच्या सरी कोसळल्यानंतर सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसून आले. दिवसभरात शहरातील विविध भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. काही भागात जोरदार पावसानेही हजेरी लावली. रविवारी देखील ही स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
धरणातून पुन्हा विसर्ग
जिल्ह्यातील ९ धरणांमधून केला जाणारा विसर्ग शुक्रवारी (दि.३१) रात्री थांबविण्यात आला होता. मात्र, धरण क्षेत्रात रात्रभर अवकाळीने हजेरी लावल्याने सकाळी ६ वाजेपासून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला. ४०० क्युसेकने सुरू केलेला विसर्ग दुपारी १२ वाजेपर्यंत तीन हजार १५५ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता पुन्हा त्यात कपात करून दोन हजार ४२१ क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू ठेवण्यात आला.