नाशिक : गेल्या पंधरा दिवसांपासून पडणाऱ्या पावसाला शनिवार ( दि.२८) सकाळपासून ब्रेक लागल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला. रस्ते कोरडे झाल्याने वाहतूक काही अंशी सुरळीत झाली असून ढगाळ हवामान असले तरी पावसाचा जोर सध्या ओसरला आहे. गंगापूर धरणातून होणारा विसर्ग कमी केल्याने गोदावरीतील पाणी पातळीही खालावली आहे.
शुक्रवारी (दि.२७) रोजी गंगापूर धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने धरणातून सुरू असलेल्या १३६० क्यूसेक विसर्गता वाढ करून तो २७२० क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला होता, त्यामुळे नदीच्या पात्रात पाणी दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत आले. मात्र शनिवारी सकाळी १० वाजता आणि दुपारी १ वाजता प्रत्येकी ६८० क्युसेकने विसर्ग कमी करण्यात आला, आता तो १३६० क्युसेकवर स्थिर आहे.
पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी पीक लागवडीची कामे वेगाने सुरू केली आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
सिन्नर, येवला, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी भागात मागील चार दिवसांत जोरदार पाऊस झाला होता. आता या भागांतही केवळ तुरळक सरींचे वातावरण असून जिल्हा प्रशासनाने नाल्या व सखल भागात राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचे, तसेच शेतीकामांदरम्यान विजांच्या कडकडाटावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.
धरण - क्युसेक
दारणा - 2690
गंगापूर - 1360
पालखेड - 678
होलकर ब्रीज - 2881
नांदुरमध्यमेश्वर -