Nashik Rain Update | जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच, धरणांमधून विसर्ग सुरु

कडवातून विसर्ग; दारणाच्या विसर्गात वाढ

Darna Dam Nashik
दारणाच्या विसर्गात वाढpudhari photo
Published on
Updated on

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि.२५) दिवसभर पावसाने हजेरी लावली. पश्चिम पट्ट्यातील संततधार कायम आहे. नाशिक शहर व परिसरात हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. सततच्या पावसामुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ होत आहे. गंगापूर ५० टक्के भरल्याने शहरवासीयांवरील पाणीसंकट दूर सरले आहे. इगतपुरीत दारणा, भावलीनंतर कडवा धरणामधून ८०० क्यूसेकने विसर्ग सुरू केला आहे.

राज्यात पावसामुळे आबादानी झाली असताना नाशिकवरही त्याची कृपावृष्टी होत आहे. जिल्ह्यामध्ये पश्चिम पट्ट्यात संततधार कायम आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर असून, सलग चौथ्या दिवशीही तालुक्यात १०० मिमीच्या वर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे भात लागवडीला वेग आला आहे. सलगच्या पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह समूहातील अन्य प्रकल्पांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. गंगापूरचा जलस्तर २८१२ दलघफूवर पोहोचला आहे. त्यामुळे शहरवासीयांवरील पाणीकपातीची टांगती तलवार टळली आहे.

इगतपुरीतही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे तालुक्यात भातशेतीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यातील दारणा व भावलीनंतर कडवामधूनही विसर्ग सुरू करण्यात आल्याने तालुकावासीयांना दिलासा मिळाला आहे. दारणात वेगाने आवक होत असल्याने धरणामधील विसर्गात ११ हजार ९४६ क्यूसेकपर्यंत वाढ केली आहे. कडवातून सायंकाळी ६ ला प्रथम २०० व त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढ करत ८०० क्यूसेकपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दारणा समूहातील विसर्गामुळे नांदूरमध्यमेश्वरमधील विसर्ग ११ हजार ७९ क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला. पेठ व सुरगाण्यातही पावसाचा जोर अधिक असल्याने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांत ही रिपरिप कायम असल्याने शेतकरीराजा सुखावला आहे.

नाशिकसाठी येलो अलर्ट

हवामान विभागातर्फे नाशिकला शुक्रवारी (दि.२६) येलो अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत काही भागांत तसेच घाटमाथा परिसरात जोरदार सरी बरसतील, असा अंदाज आहे. जिल्ह्यात १ जूनपासून ते आजतागायत ४२४ मिमी पर्जन्य होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ३५६ मिमी पर्जन्य झाले असून, त्याचे प्रमाण ८४ टक्के इतके आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news