Nashik Rain Update | राज्यात धुवाधार; नाशिकमध्ये कोरडेठाक

पावसाची प्रतीक्षा : धरणांमध्ये मर्यादित जलसाठा
Nashik Rain Update
पावसाअभावी जुलै महिन्यातही गंगापूर धरणात असलेला अत्यल्प साठाpudhari photo

नाशिक : राज्यामध्ये एकीकडे पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू असताना नाशिक जिल्ह्याला अद्यापही पावसाने दडी मारली आहे. जून कोरडाठाक गेला असतानाच चालू महिन्यात अपेक्षित पर्जन्य झालेले नाही. यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरी २७९ मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांचे गणित बिघडले आहे. तर धरणांमध्येही मर्यादित जलसाठा उपलब्ध असल्याने चिंतेत भर पडली आहे.

गेल्या आठवड्याभरापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबईत पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. तर विदर्भातही पावसाने नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले असून, पश्चिम महाराष्ट्रातही त्याने चांगली हजेरी लावली. मराठवाड्यात एक-दोन जिल्हे वगळता अन्यत्र सर्वत्र दमदार पर्जन्य झाले आहे. मात्र, एकीकडे राज्यात पावसाचे चांगले प्रमाण असताना उत्तर महाराष्ट्रात त्यातही विशेष करून नाशिकवर पावसाने अवकृपा केल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात ढगाळ हवामान तयार होत असले तरी वारंवार पाऊस हुलकावणी देत आहे. पावसाळी तालुके अशी ओळख असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह नाशिक, पेठ, कळवण व सुरगाणा या तालुक्यांमध्ये १ जूनपासून ते आजतागायत सरासरी पावसाची कमी नोंद झाली आहे. तर बागलाणमध्ये सरासरीच्या ९६ टक्के पर्जन्य झाले असून, उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी पार केली आहे. परंतु, एकूणच वार्षिक सरासरीच्या तुलनेने बघता पावणेदोन महिन्यांत केवळ ३० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्यांनाही फटका बसत असल्याने शेतकरीराजा चिंतातुर आहे. धरणांच्या जलसाठ्यातही अपेक्षित वाढ झाली नसल्याने सामान्यांमध्ये भीती दाटली आहे.

Nashik Rain Update
Nashik | विजेचा शॉक लागून बिबट्या आणि मोराचा मृत्यू

सहा तालुक्यांत कमी पर्जन्य

जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान आहे. १ जूनपासून ते आजपर्यंतची सरासरी बघता इगतपुरीत सर्वात निच्चांकी ४३.३ टक्के पाऊस झाला आहे. मालेगावला १२०.६, बागलाण ९५.८, कळवण ६३.७, नांदगाव १३०.७, सुरगाणा ५१.४, नाशिक ५४.५, दिंडोरी ९७.६, पेठ ४८.२, निफाड १२३.२, सिन्नर १११.७, येवला १३७.१, चांदवड १३३, त्र्यंबकेश्वर ७२.३ व देवळ्यात १५३.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

धरणांत 24 टक्के साठा

नाशिक जिल्ह्यात मृग, पुनर्वसू व आद्रा या तिन्ही नक्षत्रांत पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही. त्यामुळे प्रमुख २४ प्रकल्पांमध्ये केवळ २४ टक्क्यांच्या आसपास जलसाठा उपलब्ध आहे. शुक्रवार (दि. १९)पासून पुष्प नक्षत्रास प्रारंभ झाला असून, ते २ ऑगस्टपर्यंत असेल. पुष्प नक्षत्राचे वाहन बेडूक आहे. त्यामुळे या कालावधीत जनतेला चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news