नाशिक : शहरासह त्र्यंबकेश्वर व गंगापूर धरणक्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारने गोदावरी नदीला पूर आल्यामुळे दुतोंड्या मारुती छातीपर्यंत बुडाला आहे. गत आठवड्यात विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर गेल्या तीन दिवसांपासून वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गुरुवार, शुक्रवारी संततधार सुरू होती, मात्र शनिवार आणि रविवारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. परिणामी, जनजीवन विस्कळीत झाले होते. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गाेदावरीला पूर आल्यामुळे रामकुंड परिसरातील छोटी मंदिरे पाण्याखाली गेली. पूर आल्याने गंगाघाटावरील टपरीधारकांनी त्यांच्या टपर्या भांडीबाजारात हलविल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम हाेता. सर्वाधिक पर्जन्यमान 141 मिलिमीटर सुरगाण्यात नोंदविण्यात आले. त्याखालोखाल पेठ 98.5, त्र्यंबकेश्वर 88.7, दिंडोरी 68.5, इगतपुरी 64.0 पावसाची नोंद करण्यात आली. रविवारी (दि. २५) दुपारी 3 पर्यंत गंगापूर धरणातून 8,428, दारणा 14,674, भावली 588, भाम 2,990, गौतमी 2,560, वालदेवी 107, कादवा 5,626, आळंदी 243, भोजापूर 2,800, पालखेड ६४७० क्यूसेक विसर्ग करण्यात आला. दरम्यान, जायकवाडीच्या धरणसाठ्यातही सतत वाढ होत असून आतापर्यंत नांदूरमध्यमेश्वर धरणातून सोडलेले 20.40 टीएमसी पाणी जायकवाडीला पोहोचले आहे.
बागलाणमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याने घरे, गोठ्यांसह शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. सुरगाणा तालुक्यातील मौजे गोगुळ येथील अर्जुन घुले यांच्या घराची भिंत पडून सिमेंट पत्र्याचे नुकसान झाले. सिन्नरमध्येही झाडांची पडझड झाली.
पावसाचा जोर वाढल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे काठावर असणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्यासह पात्रात न जाण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने महापालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, त्यानंतरही काही तरुणांनी त्याकडे दुर्लक्ष करत थेट पुराच्या पाण्यात उड्या घेतल्याचे दिसून आले.
पावसाचा जोर वाढल्याने सोमेश्वर धबधबा परिसरालाही पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. पाण्याचा वेग अधिक असल्याने धोक्याचा इशारा देऊनही रविवार असल्याने सुटीमुळे पर्यटकांनी या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासनाने येथे बॅरिकेडिंग करण्याची गरज निर्माण झाली आहे.