

Nandurbar Rain Updates
नंदुरबार : गेल्या २४ तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने नंदुरबार जिल्ह्याला प्रचंड उष्णता आणि उकाड्यापासून मोठा दिलासा दिला आहे. मात्र, या पावसासोबत आलेल्या विजांच्या रौद्र रूपाने मोठे संकटही उभे केले. नंदुरबार शहरालगतच्या चौपाळे शिवारात एका शेळ्यांच्या कळपावर वीज कोसळून तब्बल २६ शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही हृदयद्रावक घटना नंदुरबार शहरापासून जवळच असलेल्या मधुबन सोसायटी परिसरातील चौपाळे शिवारात घडली. मंगळवारी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. याचदरम्यान, चरण्यासाठी गेलेल्या शेळ्यांच्या कळपावर वीज कोसळल्याने ही दुर्घटना घडली. अचानक झालेल्या या घटनेने पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
मे महिन्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसाने जिल्ह्यात मोठे नुकसान केले होते. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जून महिन्याच्या सुरुवातीलाही वादळी पाऊस आणि विजांनी शेती व घरांचे नुकसान केले होते. ५ जून २०२५ रोजी विजांच्या तडाख्यासह झालेल्या पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील मांडळ परिसरात १२२ घरांची पडझड झाली होती, तर खर्दे खुर्द येथे निलेश मन्साराम भिल यांचा मृत्यू झाला होता आणि दिनेश बन्सीलाल भिल हे जखमी झाले होते. तसेच, अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथेही वीज पडून एका मुलीला प्राण गमवावे लागले होते. यापूर्वीच्या अवकाळी पावसामुळे जिल्हाभरात २०० हून अधिक घरांचे नुकसान झाले होते. या सततच्या नुकसानीनंतर नागरिक प्रचंड ऊन आणि उकाड्याने हैराण झाले होते व पावसाची आतुरतेने वाट पाहत होते.
अखेर, मंगळवार, १८ जून २०२५ रोजी सकाळपासून पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आणि विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार पावसाने अनेक भागांना झोडपून काढले. नंदुरबार, शहादा आणि नवापूर तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. नंदुरबार तालुक्यात सकाळपासून सुरू असलेला पाऊस बुधवार, १९ जून २०२५ रोजीही कायम होता. या संततधार पावसामुळे नंदुरबार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
नवापूर तालुक्यात कालच्या पावसात एक घर कोसळल्याची घटना वगळता विशेष नुकसान झालेले नाही. अक्कलकुवा तालुक्यातही अद्याप कोणत्याही मोठ्या नुकसानीची नोंद झालेली नाही.
नंदुरबारचे तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यात ६५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. प्रशासनाकडून पिकांच्या नुकसानीचा आणि घरांच्या पडझडीचा तपशील गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. चौपाळे शिवारात वीज पडून २६ शेळ्या मरण पावल्याच्या घटनेचा पंचनामा केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पावसाने दिलासा दिला असला तरी, या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीने चिंतेचे वातावरण पसरले आहे.