

नगरसूल (नाशिक) : येवला तालुक्यातील नगरसूल, हाडप सावरगाव, कुसमाडी परिसराला शनिवारी (दि. ७) सायंकाळी ७ ते ८ च्या सुमारास वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. या पावसामुळे घरांचे पत्रे उडाले, विजेचे खांब कोसळले, झाडे उन्मळून पडली. जनावरांच्या शेडसह लाखोंचे नुकसान झाले.
येथील पवार वस्तीवर शरद पवार आणि किसन पवार यांच्या घरांचे पत्रे जोरदार वाऱ्यामुळे सुमारे १०० ते १५० फूट अंतरावर शेतात उडून गेले. पावसावेळी घरात पती- पत्नी आणि नात उपस्थित होत्या. घराचे छत हालू लागल्याने शरद पवार यांनी छताला बांधलेली झोळी खाली ओढत असताना अचानक पत्रे उडाल्याने ते जमिनीवर कोसळले आणि विटा पडल्याने जखमी झाले. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी आणि नातीच्या शेजारीही विटांचे तुकडे पडल्यामुळे आराध्या या चिमुरडीच्या हाताला दुखापत झाली. शरद व श्रावण पवार हे किरकोळ जखमी झाले. घटनास्थळी मंडळ अधिकारी गणेश लाडेकर यांनी पंचनामा केला असून, सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हाडप सावरगाव येथील योगेश, निवृत्ती व सीताराम घोडेस्वार, बबन कोल्हे यांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले असून, भगवान काजळे यांच्या गोठ्याचे छप्पर उडाल्याने गायीच्या मानेला गंभीर जखम झाली आहे. तिच्यावर टाके टाकून उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेनंतर रविवारी (दि.7) रोजी सकाळी शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी २१ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. यावेळी माजी सरपंच सुभाष निकम, राष्ट्रवादीचे सुनील पैठणकर, अॅड. मंगेश जाधव, कांतीलाल साळवे, विकास निकम, कोतवाल गाडेकर, प्रमोद निकम आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
नगरसूलसह परिसरात मोठ्या प्रमाणात विजेचे खांब, झाडे पडली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ दुरुस्ती करीत वीजपुरवठा सुरळीत केला.
हडप सावरगाव आणि कुसमाडी येथे वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत करावी, त्यांना घरकुल मंजूर करावे.
संभाजी पवार, शिवसेना नेते.