नाशिक : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने शहरात पुन्हा दमदार हजेरी लावली असून गत 24 तासांत 31.2 पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान सोमवारी (दि.14) रोजी शहरासह जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या सरींनी हजेरी लावली. यामुळे काही प्रमाणात शहरातील दैनंदीन जीवन विस्कळीत झाले.
नाशिक जिल्हयात मे महिन्याच्या मध्यापासून पाऊस सुरू आहे. मे महिन्यात अवकाळी पावसाने जिल्हयाला झोडपले तर जुन महिन्यातही नियोजितवेळी पाऊस सुरू झाला त्यामुळे जिल्हयातील धरण साठ्यात पाणी पातळीत वाढ झाली तर नाशिककरांवरील पाणी टंचाईचे संकट वर्षभरासाठी दुर झाले आहे. गत 15 दिवसांपासून गंगापूर धरणातून विसर्ग सुरु होता. विसर्ग बंद झाल्यानंतर आता जिल्ह्यातील धरणसमुहातही 67.43 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील सात धरणे शंभर टक्के भरली आहेत. जुलैच्या पहिल्या आठवडयात पंधरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता मात्र गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर धरणातून विसर्गही थांबवण्यात आला होता. सोमवारी वाकी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस दमदार पाऊस झाल्याने दि. 14 जुलै रोजी सायंकाळी 5 वा. वाकी धरणातून 193 क्यूसेसने विसर्ग करण्यात आला.
नाशिक जिल्हयात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्हयातील धरणातून आतापर्यंत 3 लाख 58 हजार 863 पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून 3 लाख 10 हजार ,17 दलघफू पाणी जायकवाडी धरणाकडे रवाना झाले आहे.
शहरात सतत सुरू असणार्या पावसामुळे रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. सर्वच प्रमुख मार्गावर खडड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. पावसाळा संपल्याशिवाय मनपाकडून खड्डे बुजविण्याची शक्यता नाही त्यामुळे वाहनधारकांना पूर्ण पावसाळा खड्ड्यांचा त्रास सहन करतच वाहने चालवावी लागणार आहेत.