

नाशिक: शहरात पुढील तीन दिवस मुसळधार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान गंगापूर धरणातून सध्या विसर्ग चालू असून पाटबंधारे विभागाने 30 सप्टेंबरपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील १४ हजार हेक्टरचे नुकसान झाले असून वीस हजाराहून अधिक शेतकरी बाधित झाले आहे.
जिल्ह्यातील नांदगाव मालेगाव तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून नुकसान झाले आहे. अन्य ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसल्या आहे. परंतु हवामान विभागाने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्याने पाटबंधारे विभाग सतर्क झाले आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे. पण हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असला तरी विशिष्ट भागातच काही प्रमाणात पाऊस पडला. शनिवारी काही ठिकाणी सायंकाळच्या सुमारास हलक्या सरी बरसल्या. गंगापूर धरणातून शनिवारी २८०१ क्सुसेक विसर्ग सुरू आहे. त्यात हवामान खात्याने रात्री उशिरा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार असून तशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
65 गावांमध्ये 20 हजाराहून अधिक शेतकरी बाधित
जिल्ह्यात दोन दिवसात 14 हजार हेक्टरी पिकांचे नुकसान झाले असून 65 गावांमध्ये 20 हजाराहून अधिक शेतकरी बाधित झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. या पावसाचा कापूस ५११९ हेक्टर , मका ४६३१ हेक्टर , कांद्याला १७५३ हेक्टर इतका या पिकांना फटका बसला आहे. यात मालेगाव ,नांदगाव, व सुरगाणा या 3 तालुक्यात नुकसान झाले आहे.
धरणातील विसर्ग (क्युसेकमध्ये)
दारणा ५५०
गंगापूर २८०१
वालदेवी ६२
आळंदी २४३
होळकर ३५९०
भावली १३५
पालखेड १७३२