चांदवड : पुणेगाव दरसवाडी पोहच कालव्यास रब्बी हंगामाचे हिवाळी आवर्तन येत्या १५ जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात सोडण्याच्या सूचना आमदार डॉ. राहुल आहेरांनी सबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामुळे कालव्याच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नाशिक येथील पालखेड पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पुणेगाव दरसवाडी कालव्याची सल्लागार समितीची बैठक चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, नांदूरमधमेश्वरचे कार्यकारी अभियंता ढोकचवळे आदी उपस्थित होते.
चांदवड तालुक्यासाठी पुणेगाव दरसवाडी पोहच कालव्याची निर्मिती झाली आहे. या कालव्याचे अस्तरीकरणाचे नव्याने कामकाज होऊन कालव्याची चाचणी शेवटच्या टोकापर्यंत यशस्वीपणे करण्यात आली. कालव्याला कुठेही चढउतार नसून पाणी पूर्ण वहनक्षमतेने वाहत आहे. सध्या, रब्बी हंगामातील कांदे, द्राक्ष, गहू, हरभरा पिकांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. कालव्यास पाणी सोडल्याने गावागावांतील छोटे-मोठे तलाव भरले जाणार आहे. पर्यायाने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन उन्हाळ्यात पाणी टिकण्यास मदत होणार आहे.