

नाशिक : नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या नव्याने जाहीर झालेल्या शिर्डीमार्गे वळवलेल्या आराखड्याचा तातडीने पुनर्विचार करून सिन्नर-संगमनेर- नारायणगाव- मंचर-चाकण मार्गे थेट नाशिक-पुणे जोडणी द्यावी, अशी मागणी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.
खा. वाजे यांनी रेल्वेमंत्रींची भेट घेत नाशिक आणि पुणे या दोन महत्त्वपूर्ण औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी केंद्रांदरम्यान थेट रेल्वे जोडणीबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी जीएमआरटी संवेदनशील क्षेत्र टाळण्याच्या कारणामुळे मार्ग बदलला जात असला तरी मूलभूत प्रश्न कायम राहील असे नमूद केले. यापूर्वी संसदेत उत्तर देताना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रस्तावित रेल्वे मार्गाला शिर्डी आणि अहिल्यानगरमार्गे वळवण्याचा निर्णय घेतला असून, नारायणगावजवळील जायंट मिटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी)च्या संवेदनशील रेडिओ-क्षेत्रामुळे हा बदल करण्यात आल्याचे म्हटले होते.
मात्र, या वळवलेल्या मार्गामुळे प्रकल्पाचा मूळ हेतू, प्रवासाचा कालावधी आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने होणारी प्रचंड हानी याकडे खा. वाजे यांनी रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले. नाशिक-पुणे हा मार्ग महाराष्ट्राच्या औद्योगिक त्रिकोणाचा कणा आहे. त्यामुळे हा मार्ग थेटच असावा,' अशी मागणी त्यांनी केली. तसेच नाशिक-पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प हा उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक वृद्धीचा महामार्ग आहे. त्याला वळसा घालणे म्हणजे या भागाचा विकास रोखण्यासारखे असल्याचे म्हटले.
इंजिनिअरिंग उपायांद्वारे समाधान शक्य
जगभरात संवेदनशील वैज्ञानिक केंद्रांसोबत अनेक मोठ्या वाहतूक संरचना सहअस्तित्वाने चालतात, हे नमूद करत खासदार वाजे यांनी पर्यायी अभियांत्रिकीय उपाय, संरक्षणात्मक तंत्रज्ञान व समायोजित मार्गनियोजनाद्वारे जीएमआरटी क्षेत्राचे रक्षण करत थेट नाशिक-पुणे मार्ग शक्य आहे, असे सांगितले. त्यामुळे, वळवलेल्या नव्या आराखड्याचा पुनर्विचार करून, तज्ज्ञ समितीकडून वैज्ञानिक, तांत्रिक व सामाजिक दृष्टिकोनातून नव्याने मूल्यमापन करावे, अशी त्यांची मुख्य मागणी आहे.