

नाशिक : अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण्यांच्या परस्पर वादाचा बळी नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प ठरत असल्याचा गंभीर आरोप सीमा संघटनेतर्फे करण्यात आला. सिन्नर-संगमनेर मार्ग वळवून रेल्वे शिर्डी-अहिल्यानगरमार्गे नेण्याचा निर्णय हा केवळ स्वार्थी राजकारणाचा परिपाक असून, याविरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा सिन्नर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सिमा) संघटनेतर्फे देण्यात आला.
लोकसभेत रेल्वेमंत्र्यांनी नाशिक-पुणे रेल्वे शिर्डी-अहिल्यानगरमार्गे जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर सिन्नर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. यावर सीमा संघटनेने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये अध्यक्ष किशोर राठी, उपाध्यक्ष किरण भंडारी, सचिव बबन वाजे, खजिनदार राहुल नवले, रतन पडवळ, अरुण चव्हाणके, मारुती कुलकर्णी, मुकेश देशमुख, शांताराम दारुंटे, सतीश नेहे, सारंग कुलकर्णी, शशिकांत नवले, नवनाथ नागरे, महादेव बेल्हे, तानाजी वारुंगसे आदी उद्योजकांनी तीव्र विरोध दर्शविला. याबाबत सीमा सचिव बबन वाजे म्हणाले की, नाशिक-पुणे रेल्वे मार्ग मंजूर झाल्यानंतर सिन्नर-संगमनेर परिसरात मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना भरपाईदेखील देण्यात आली. मात्र, राजकीय स्वार्थामुळे जीएमआरडीचे खोटे कारण पुढे करून रेल्वेचा मार्ग शिर्डीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जगभरातील 15 ठिकाणी जीएमआरडी प्रकल्पांच्या जवळून रेल्वेमार्ग गेलेले असून, कुठेही अडचणी आढळल्या नाहीत. रेल्वेमंत्र्यांकडून कोणताही अभ्यास न करता हा निर्णय घेतल्यामुळे सिन्नर-संगमनेरच्या औद्योगिक विकासाला मोठा फटका बसणार आहे.
सिमा संघटनेने स्पष्ट केले की, नाशिक-पुणे रेल्वेचे सर्वेक्षण पूर्ण झाले होते आणि शेतकऱ्यांना भरपाईही दिली होती. मात्र सरकार बदलल्यानंतर हा मार्ग पळवून नेण्यात आला. विकासकामांमध्ये राजकारण करणे चुकीचे असून याविरोधात मोठा जनलढा उभारण्यात येणार आहे, असे संघटनेने सांगितले.
आमदार-खासदारांनी एकजूट दाखवावी
संघटनेने जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदारांना, राजकारण बाजूला ठेवून एकजूट दाखवण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्व नागरिक, सामाजिक संस्था आणि उद्योग क्षेत्राने या आंदोलनात राजकारण विरहित सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. सिन्नर, संगमनेरमार्गेच नाशिक-पुणे रेल्वे व्हावी, हा जनतेचा ठाम निर्धार आहे. आता एकजूट दाखवण्याची आणि विकासाच्या हक्कासाठी लढण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही सिमा संघटनेने केले.
महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी स्पष्ट केली भूमिका
नाशिक : प्रस्तावित नाशिक-पुणे रेल्वेचा नव्याने मार्ग बदलण्यात आला आहे. हा मार्ग पूर्णत: वेळखाऊ असून त्यास महाराष्ट्र चेंबरच्या नेतृत्वाखाली विरोध दर्शवला जाणार आहे. त्यासाठी लवकरच आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी व विविध संघटनांसमवेत समन्वय बैठक घेण्यात येणार असल्याचे चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी स्पष्ट केले.
नाशिक-पुणे प्रस्तावित रेल्वे गेल्या अनेक दशकापासून प्रलंबित आहे. त्यात नवनवीन अडथळे येत आहेत. नवीन प्रस्तावित मार्गास विरोध करत पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या मार्गाप्रमाणे नाशिक सिन्नर, संगमनेर, चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव, खेड या मार्गेच करण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करण्यात येणार आहे. नाशिक-पुणे रेल्वेच्या नव्या मार्गामुळे नारायणगाव, खेड या भागातील कृषी उत्पादने व कृषी प्रक्रिया उद्योगांसह असलेल्या व्यापार, उद्योगाचे दीर्घकालीन नुकसान होणार आहे. शिवाय या भागाचा विकास खुंटण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक-पुणे पूर्वी ठरल्याप्रमाणे केला जात नसेल तर तर सिन्नर, संगमनेर, साकुर, मंचरमार्गे पुणे अथवा बोगदा करून १२ ते १५ किलोमीटर दूरवरून अशा स्वरूपात नाशिक-पुणे रेल्वे मार्ग करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे साेनवणे यांनी स्पष्ट केले.
नाशिक-पुणे रेल्वेसाठी मोठ्या प्रमाणात सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या आहेत. आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे काम जलदगतीने होईल. मात्र, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केलेल्या प्रस्तावित मार्गासाठी सर्व प्रक्रिया पुन्हा करावी लागेल. या प्रक्रियेत वेळ आणि पैसा खूप लागेल. आधीच्या मार्गासाठी घेतलेल्या शेतजमिनी व त्यासाठी दिलेला मोबदल्याचे काय, त्यामुळे आधीचा मार्ग चांगला असून, वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार आहे. त्यामुळे जुन्याच मार्गाचा विचार करावा, अशी मागणीही सोनवणे यांनी केली.
चार तासांचा अवधी
पूर्वीच्या योजनेप्रमाणे दोन तासात पुणे-नाशिक अंतर पूर्ण करणे शक्य होणार होते. ते आता ३ ते ४ तास एवढा अवधी लागणार आहे. त्यामुळे नव्या मार्गाचा विचार केल्यास त्यास सर्व स्तरातून विरोध होण्याची शक्यता आहे. अशात रेल्वे मंत्र्यांनी जनभावना विचारात घेऊन जुना मार्ग अंतिम ठेवावा, अशी मागणीही चेंबरतर्फे केली जात आहे.