

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पुण्याच्या दिशेने नाशिककडे येणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गापैकी द्वारका ते सिन्नरफाटा या ७.८ किलोमीटर रस्त्यांच्या नुतनीकरणाकरीता तब्बल २९२ कोटींचा प्रस्ताव नाशिक महापालिकेतर्फे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केला जाणार आहे.
नाशिकमध्ये येत्या २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जोरदार प्रशासकीय तयारी सुरू आहे. सिंहस्थासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या कुंभमेळा प्राधिकरणामार्फत सिंहस्थ कामांना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत केल्या जाणाऱ्या ५७५६ कोटींच्या सिंहस्थ कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील ६१ रस्त्यांची यादी सादर करत या रस्त्यांसाठी २०६८ कोटींची मागणी केली होती.
प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यात २१ रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता देत ९३० कोटींना मंजूरी दिली होती. त्यानंतर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रविण गेडाम यांनी दुसऱ्या टप्प्यात ९ रस्त्यांसाठी २९८.५५ कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी दिली. महापालिकेमार्फत या रस्ते कामांच्या निविदा जारी करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे १२२८ कोटींच्या रस्ते विकासाला चालना मिळाली आहे. सिंहस्थात पुण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यानुसार नाशिक-पुणे महामार्गावरील महापालिका हद्दीतील द्वारका ते सिन्नरफाटा या रस्त्याचे नुतनीकरण सिंहस्थ कामांतर्गत प्रस्तावित करण्यात आले आहे. या रस्त्याची अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करण्यात आली असून त्यानुसार रस्ते विकासासाठी २९२ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महापालिकेमार्फत तयार करण्यात आला आहे. सदर रस्ता राज्य महामार्गाचा हिस्सा असल्याने या रस्ते विकासासाठीचा प्रस्ताव महापालिकेने राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्याची तयारी केली आहे.
डबल डेकर उड्डाणपुलाचा प्रस्ताव थंड बस्त्यात
निओ मेट्रो योजनेअंतर्गत द्वारका ते दत्तमंदिर दरम्यान डबल डेकर उड्डाणपुलाची उभारणी प्रस्तावित होती. परंतु निओ मेट्रोचा प्रकल्प थंड बस्त्यात गेल्याने डबल डेकर उड्डाणपुल उभारणीचा प्रस्तावही गुंडाळला गेला आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी २९२ कोटींना प्रशासकीय मंजुरी मिळाल्यास डबल डेकर उड्डाणपुलाची योजना नामशेष होणार आहे.