Nashik | वेटरला लुटणाऱ्या सावकाराचा शोध लागला, तो पोलिस दलातच नोकरीला

गुन्हा दाखल झाल्यापासून आहे फरार
Nashik
वेटरला लुटणाऱ्या सावकाराचा शोध लागला असून तो ग्रामीण पोलिस दलात मुख्य लिपिक म्हणून कार्यरत आहेFile Photo
Published on
Updated on

नाशिक : सव्वा लाख रुपये व्याजाने देत त्या मोबदल्यात वेटरकडून चक्रवाढ व्याजदराने आठ लाख रुपये वसूल करणाऱ्या सावकाराचा शोध शहर पोलिसांनी लावला आहे. संशयित सावकार सुनील अर्जुन महाजन हा ग्रामीण पोलिस दलात मुख्य लिपिक म्हणून कार्यरत आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित महाजन कुटुंब पसार झाले असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सुनीलसह त्याची पत्नी ज्योत्स्ना, त्यांचा नातलग दीपक महाजन आणि चुलत सासऱ्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात अवैध सावकारीसह खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. रामनगर परिसरातील रहिवासी दशरथ पंडित साबळे (४४) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी औषधोपचारासाठी २०१६ मध्ये महाजनकडून दहा टक्के व्याजदराने १ लाख ३० हजार रुपये घेतले. कर्ज फेडण्यासाठी साबळे यांनी २०२० पर्यंत दरमहा १३ हजार रुपये दिले. त्यानंतरही महाजनने अतिरिक्त आठ लाखांची मागणी केली. तुझी शेतजमीन नावावर कर, नाहीतर तुझ्या कुटुंबीयांना जीवे मारू, अशी धमकी महाजन कुटुंबीयांनी साबळे यांना दिली होती. मार्च २०१९ मध्ये साबळेंनी खासगी बँकेतून सात लाख ९० हजारांचे कर्ज घेत त्यातून महाजनसह संशयितांना एक लाख रुपये दिले. तरीही संशयित पैसे मागत असल्याने साबळे यांनी ५ मार्च रोजी ३४ हजार ५८६ रुपये रोख रकमेसह २ लाख रुपये व मागील व्याज एक लाख आणि ३५ हजारांचे तीन हप्ते व अधिक ६५ हजार ४१४ रुपये दिले. पुन्हा व्याजापोटी पन्नास हजार दिले.

अंबड पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगत महाजनने वारंवार पैसे मागितले. त्यामुळे सततच्या त्रासाला, धमक्यांना त्रस्त होऊन साबळे यांनी अखेर पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून महाजनसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संशयित फरार

संशयित सुनील महाजन हा याआधी नाशिक पोलिस आयुक्तालयात लिपिक होता. काही महिन्यांपूर्वी त्याची बदली नाशिक ग्रामीण अधीक्षक कार्यालयात झाली असून, पत्रव्यवहार शाखेचा तो मुख्य लिपिक आहे. गंगापूर पोलिस महाजन याच्या त्र्यंबक रोडवरील वेद मंदिराजवळील घरी गेले, तेव्हा महाजनची पत्नी ज्योत्स्ना घरात होती, तर महाजन व दीपक बाहेर होते. तर, सायंकाळ झाल्याने ज्योत्स्ना यांना पोलिसांनी ताब्यात घेतले नाही. मात्र, त्यांच्या घरात साबळे यांच्या घरातील टीव्ही आढळून आल्याने पोलिसांनी तो टीव्ही जप्त केला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गंगापूर पोलिस महाजनच्या घरी गेले असता, घरास कुलूप आढळून आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news