

नाशिक : गिरणा सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाल्यावर सुरू असलेल्या गिरणा पब्लिक स्कूलमध्ये उपशिक्षक पदावरून मुख्याध्यापक पदावर पोहोचलेल्या संशयिताने मान्यतेसाठी संस्थाध्यक्षांच्या बनावट सह्या केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून शालेय गैरकारभार, दस्तऐवजांची छेडछाड आणि अधिकारांचा गैरवापर झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. रवींद्र भगवान निकम (रा. मु. पो. दाभाडी, ता. मालेगाव) असे संशयिताचे नाव आहे. सुरेश रामराव निकम (७२, रा. स्नेह, पटेलनगर, सटाणा नाका, ता. मालेगाव) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार ते सन १९९१-९२ या कालावधीत गिरणा कारखान्याचे संचालक होते.
दरम्यान, कारखान्याच्या संलग्न शिक्षण संस्थेअंतर्गत चालणाऱ्या गिरणा पब्लिक स्कूलमध्ये मुख्याध्यापक पदाबाबत नियमबाह्य प्रक्रिया राबविण्यात आल्याचे समोर आले. त्यानुसार रवींद्र निकम यांनी मुख्याध्यापक पदाची मान्यता मिळवण्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाचा ठराव व अध्यक्षांच्या सह्या बनावट स्वरूपात वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कागदपत्रांवर संस्थाध्यक्षांच्या सह्या असल्याचे दाखवून त्या आधारे शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात त्या सह्या अध्यक्षांनी केल्याचे नाकारले असून, कोणताही वैध ठराव मंजूर झाला नसल्याचे सुरेश निकम यांचे म्हणणे आहे.
१९९० च्या दशकापासून संस्थेतील कारभारात बदल, संचालक मंडळातील पदे, अध्यक्ष उपाध्यक्ष नियुक्त्या याबाबत वेगवेगळ्या कालखंडात निर्णय झाले. मात्र, २३ जानेवारी २०१५ ते ८ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत मुख्याध्यापक पदाबाबत सादर झालेल्या प्रस्तावांमध्ये तारखा, ठराव क्रमांक, सह्या यामध्ये विसंगती आढळली. काही कागदपत्रांमध्ये अध्यक्षांच्या नावाने सह्या दाखवण्यात आल्या असल्या तरी, त्या अधिकृत नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
या संदर्भाने निकम यांनी यापूर्वीच जि. प. शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी व निवेदने सादर केली होती. काही वेळा चौकशीचे आदेश देण्यात आले. तथापि, बनावट सह्यांचा मुद्दा गंभीर असल्याने संबंधित कागदपत्रांची पडताळणी, सह्यांची तांत्रिक तपासणी (हस्ताक्षर/फॉरेन्सिक) आणि शिक्षण विभागाकडील नोंदींची छाननी सुरू केल्यावर त्यात चौकशीअंती सह्या बनावट असल्याचा अभिप्राय पुणे येथील मुख्य दस्तऐवज परीक्षकांनी दिला आहे.
शासनाचीच केली फसवणूक
रवींद्र निकम यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सन २००९ ते २०१४ या कालावधीचा शिक्षकवर्गासाठीचा गोपनीय अहवालाचा नमुना, भाग तीन, पुनर्विलोकन अधिकाऱ्याचा अभिप्राय यात अध्यक्ष म्हणून सुरेश निकम यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून ते दस्तऐवज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आर. एम. मोगल यांना सादर करून मुख्याध्यापक पदास मान्यता मिळवून पदावर काम करीत निकम व शासनाची फसवणूक केल्याचे नमूद आहे.