

नाशिक: आडगाव भागात तब्बल १२ तास वीज पुरवठा खंडीत राहिल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. शहरात अनेक ठिकाणी दोन तास वीज पुरवठा बंद होता. महावितरणाच्या व महापारेषांच्या वेगवेगळ्या उपकेंद्रांमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शहरात वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे अनेक सोसायटीमध्ये पाण्याविना दिवस काढावा लागला तर लिफ्टविना येथील नागरीकांचे हाल झाले.
ट्रान्सफॉर्मर्समध्ये बिघाड
शहरात परतीच्या पावसाने काही ठिकाणी विजेचे खांब कमकुवत झाले. तसेच अनेक ट्रान्सफॉर्मर्समध्ये बिघाड होऊन ते निकामी झाले. तसेच ताराही तुटल्या होत्या. त्यामुळे महावितरणला दुरुस्ती करण्यासाठी आज शहरातील अनेक भागात शटडाऊन करावे लागले. आडगाव परिसरात दिवसभर वीजपुरवठा खंडित होता. पंचवटी, दिंडोरी रोड, हिरावाडी, अमृतधाम, शरणपूर, गोविंदनगर या परिसरात दोन तासांचे रोटेशन घेत वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता.
पाणीपुरवठाही खंडित
आडगाव परिसरात शनिवारी सकाळी ८ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहिल्याने नागरिक त्रस्त झाले. या भागात अनेक सोसायट्यात पाणीपुरवठा खंडित झाला. तर काही भागात पाणी कमी दाबाने आले. त्यामुळे नागरिकांना पाण्याविना दिवस काढावा लागला. तर लिफ्ट वीणा सात मजली इमारत चढताना दमछाक झाली. काही खासगी कार्यालये व व्यवसाय बंद राहिले, तर काही शाळांमध्ये परीक्षेदरम्यान पंख्याविना विद्यार्थ्यांना घामाच्या धारा लागल्या.
सध्या दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली असल्याने घरगुती महिलांना पाण्याअभावी कामे करणे अवघड झाले. केवायसीसाठी महिला सेतू केंद्रावर ताटकळत थांबल्या तर काही भागात दिवसभर विजेचा लपंडाव सुरूच होता. मोबाईल चार्जिंग, इंटरनेट, तसेच दवाखान्यांतील रुग्णसेवेवरही परिणाम झाला.
लाईट बंदची कारणे अशी...
महावितरणच्या १३२ केव्ही आडगाव उपकेंद्रावर ३३ केव्ही सिंगल कंडक्टर ते डबल कंडक्टरचे अत्यावश्यक काम सुरू आहे. त्यामुळे ३३ केव्ही शिवकृपा, जानोरी, मोहाडी, दिक्षी, तसेच आडगाव गाव या परिसरांतील पुरवठा शनिवारी सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला.