

नाशिक : दिलीप सुर्यवंशी
लाखो लोकांच्या आर्थिक जीवनात प्रगती साधणार्या जनरल पोस्ट ऑफिसची एटीएम सेवा गत दोन महिन्यांपासून बंद पडल्याने सुमारे दीड लाख खातेधारक एटीएम सुविधेपासूच वंचित आहेत. याशिवाय एटीएम कार्ड पुरविणार्या कंपनीने सेवा पुरविणे बंद केल्याने हजारो खातेधारक एटीएमकार्डपासून वंचित आहेत, एटीमच्या सर्व सेवा पुनश्च सुरु होण्यासाठी किमान महिन्याभराचा कालावधी लागणार असल्याची माहिती जनरल पोस्ट कार्यालयाकडून देण्यात आली.
इंडिया पोस्टने आपल्या एटीएम सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद केल्या आहेत. या निर्णयामागे मुख्य कारण म्हणजे व्यवस्थापन सेवा पुरवणार्या कंपनीने एटीएम सेवा पुरविणे थांबविले आहे. या खासगी कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे इंडिया पोस्टच्या एटीएम सेवा बंद करण्यात आल्या आहेत. सेवा पुर्ववत सुरु करण्यासाठी इंडिया पोस्टने इंडिया पोस्टल पेमेंट्स बँकेसोबत एटीएम व्यवस्थापन सेवा हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला, परंतु सेवा पुरविणार्या कंपनीच्या असहकार्यामुळे हे शक्य झाले नाही. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी पोस्टाकडून प्रयत्न सुरु आहेत. पोस्टाकडून इंडियन पोस्टल बँकेसोबत नव्याने करार करण्यात येत आहे. यास किमान महिन्याभराचा अवधी लागणार आहे. सेवा स्थगित असतांना या काळात, पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम कार्ड वापरून रोख रक्कम काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांसाठी पुरेशी रक्कम उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
पोस्टाची स्वत:ची एटीएम सेवा बंद असल्याने ज्या खातेधारकांना एटीएम कार्ड देण्यात आले आहेत, ते इतर बँकांचे एटीएम वापरत असल्याने प्रत्येक ट्रान्झेक्शनसाठी पोस्टाला खर्च येत असल्याने यामु़ळे पोस्टाला तोटा सहन करावा लागत आहे.