

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील आडवण येथे विस्तारासाठी महिंद्रा कंपनी इच्छुक असली, तरी भूसंपादनात अडथळे येत आहेत. वास्तविक, नव्या उद्योगांमुळे रोजगार आणि विकासास चालना मिळते. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र चेंबर, निमा, आयमा आदी औद्योगिक संघटनांच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गांधी यांनी, जिल्ह्यात उद्योगांसाठी उपलब्ध जागा आणि नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी उद्योगांना जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या अडचणी सोडविण्यास सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी 'एमआयडीसी'चे कार्यकारी अभियंता जयवंत पवार, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, विजय बेदमुथा, निमा अध्यक्ष आशिष नहार उपस्थित होते. यावेळी उपस्थित उद्योजकांनी, उद्योगांना जागा मिळणे, ही गरज असून, जागा मिळण्यास विरोध होऊ नये, त्यासाठी एकत्रित येऊन सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.