नाशिक : ढिसाळ नियोजनाने गुरुजी रांगेत ताटकळले

मतदान केंद्रांवर ढिसाळ नियोजनामुळे शिक्षकांची त्रेधातिरपीट
Nashik Teacher's Constituency Election 2024
नाशिक : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शिक्षक मतदारांमध्ये सकाळ सत्रामध्ये असलेल्या उत्साहावर दुपारनंतर संथ मतदान प्रक्रियेने विरजण पडले. त्याची ही बी. डी. भालेकर अन् मखमलाबाद हायस्कूल केंद्रातील बोलकी चित्रे. (छाया: हेमंत घोरपडे)

नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (दि.२६) पार पडलेल्या मतदानावेळी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिक्षकांना तास‌नतास रांगेत उभे राहण्याची शिक्षा मिळाली. जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर दुपारपर्यंत मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर तीननंतर बहूतांश केंद्रांमध्ये टेबल वाढविण्यात आल्यानंतर मतदानाला गती मिळाली.

शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यात अपवादवगळता सर्वच ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. नाशिक शहरातील १० व ग्रामीण भागातील १९ केंद्रांवर सकाळी सातपासून शिक्षकांनी मतदानासाठी रांगा लावल्या. यावेळी शिक्षकांचा उत्साह वाखाण्याजोगा होता. नाशिक शहरातील बहुतांश शिक्षकांनी सकाळच्या सत्रात शाळा उरकल्यानंतर दुपारी केंद्रांकडे धाव घेतली. त्यामुळे केंद्रांवर गर्दी झाली. मात्र, मतपत्रिकेवर पसंतीक्रमानुसार मतदान नोंदविण्यासाठी वेळ लागत असल्याने केंद्राबाहेर लांबच-लांब रांगा लागल्या. परिणामी तीन-तीन तास रांगेत उभे राहूनही नंबर येत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला.

Nashik Teacher's Constituency Election 2024
नाशिक : मखमलाबाद मतदान केंद्रात ॲड. नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत आक्षेप घेताना मविप्रच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार.(छाया: हेमंत घोरपडे)

निवडणुकीत मतदानासाठी शिक्षकांचा उत्साह व मतदान प्रक्रियेतील संथगतीपणा तसेच केंद्राबाहेरील वाढत जाणाऱ्या रांगा लक्षात घेत अधिकाऱ्यांनी केंद्राच्या आत टेबल वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दुपारी तीननंतर बहुतेक केंद्रांमध्ये अतिरिक्त एक किंवा दोन टेबल लावण्यात आले. अतिरिक्त टेबलमुळे केंद्रात एकाचवेळी दोन-तीन शिक्षकांना मत्रपत्रिकेवर पसंती क्रमांक नोंदविणे सोपे झाले. मात्र, स्वतंत्र टेबलची व्यवस्था उभी करुनही नाशिक शहरातील बी. डी. भालेकर तसेच मखमलाबाद येथील केंद्रांवर सायंकाळी सहानंतरही रांगा कायम होत्या. त्यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविराेधात गुरूजींनी केंद्रातील अधिकाऱ्यांकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

Nashik Teacher's Constituency Election 2024
नाशिक : मखमलाबाद मतदान केंद्रात ॲड. ठाकरे यांना सूचना करताना पोलिस. (छाया हेमंत घोरपडे)

माेबाईल अन् गैरसोय

लोकसभेच्या धर्तीवर मतदान केंद्रांमध्ये मोबाईल तसेच डिजीटल वस्तूंच्या वापरावर बंदी लादण्यात आली. पाेलिस गेटवरच तपासणी करून मतदान केंद्रात प्रवेश देत होते. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या शिक्षकांपुढे ऐनवेळी मोबाईल कुठे ठेवायचा असा यक्षप्रश्न निर्माण झाला. अनेकांनी मोबाईल स्वीच ऑफ करत वाहनांमध्ये ठेवले. तरी काहीही सहकाऱ्यांकडे मोबाईल सांभाळण्यासाठी दिले. परंतु, संबंधित शिक्षक मतदान करुन बाहेर येईपर्यंत तासनतास लागत असल्याने मोबाईल सांभाळणारे शिक्षक हैराण झाले.

असुविधाच फार

लोकसभा निवडणुकीवेळी जिल्हा प्रशासानाकडून मतदारांना केंद्रांवर विविध सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत शिक्षक मतदानावेळी केंद्रांवर सुविधांपेक्षा असुविधांचा पाढा जास्त वाचला गेला. केंद्रावर बसण्याची सुविधा नसल्याने शिक्षकांना तासन‌्तास रांगेत उभे राहावे लागले. केंद्रात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यातही वरुणराजाने विश्रांती घेतल्याने गुरूजींना तेवढा दिलासा मिळाला.

Nashik Teacher's Constituency Election 2024
मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोबाईलमध्ये छबी टिपण्यासाठी शिक्षकांची लगबग (छाया हेमंत घोरपडे)

सेल्फीचा माेह की फर्मान?

मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोबाईलमध्ये छबी टिपण्यासाठी शिक्षकांची लगबग सुरू होती. माेबाईलमध्ये सेल्फी घेण्यामध्ये महिला मतदारांची आघाडी होती. काहीजणांनी सोबत असलेल्या नातेवाईकांना मोबाईलमध्ये छायाचित्र काढण्यात शिक्षक दंग होते. दरम्यान, काही संस्था व शाळा प्रशासनांनी शिक्षकांना मतदान केल्यानंतर केंद्राच्या आवारातून मोबाईलवर छायाचित्र पाठविण्याचे फर्मान सोडले होते, अशी चर्चा होती.

आजी-माजी सरचिटणीस आमने-सामने

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मखमलाबाद येथील केंद्रावर सकाळी मविप्रचे आजी- माजी सरचिटणीस आमने-सामने आल्याने थोडा वेळ वादंग निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद थोडक्यात मिटला. मात्र त्यानंतर मतदान केंद्रावर उपस्थित मतदारांमध्ये दोन वर्षापूर्वी झालेल्या ‘मविप्र’ निवडणुकीच्याच चर्चा रंगल्या होत्या.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मविप्रचे संचालक ॲड. संदीप गुळवे उमेदवार आहेत. त्यांना मविप्र संस्थेने पाठींबा दिला आहे. तर संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांचे भाचे विवेक कोल्हे हे अपक्ष उमेदवारी करीत आहेत. मतदारांना आवाहन करण्यासाठी मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी मखमलाबाद येथील मविप्रच्या छत्रपती शिवाजी महाराज शाळेमधील मतदान केंद्रावर प्रवेश केला. यानंतर लागलीच माजी सरचिटणीस पवार यांचे याठिकाणी आगमन झाले. त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश करताना त्यांना अडविले. ॲड. ठाकरे मतदार नसताना देखील केंद्रात कसे जाऊ शकतात याबाबत त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पवार यांच्या आक्षेपावर ॲड. ठाकरे हे संस्थेचे सरचिटणीस असल्याचे उत्तर देण्यात आले होते. त्यावर पवार यांनी आक्षेप घेतला आणि मतदान केंद्रात प्रवेश केला. यावर पोलिस निरीक्षकांनी मध्यस्थी केली. तसेच श्रीमती पवार आणि ॲड. ठाकरे यांना मतदानकेंद्राच्या बाहेर जाण्यास सांगितले. या प्रकारानंतर उपस्थित मतदारांमध्ये दोन वर्षापूर्वी झालेल्या मविप्र निवडणुकीतील घडामोडींच्या चर्चांचा फोडणी मिळाली.

गुन्हा दाखल करण्यावरुन यंत्रणांचा एकमेकांकडे बोट

शहरातील बी. डी. भालेकर विद्यालयातील केंद्राबाहेर मतदारांना पैसे वाटप करताना एका व्यक्तीला काही कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्या व्यक्तीला भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये नेले. पण, संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा कोणी दाखल करायचा यावरुन महसूल व पोलिसांनी एकमेकांकडे बोट दाखविल्याने उपस्थितांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

शिक्षक मतदारसंघासाठी शहरात शांतेतत मतदान सुरू असतानाच दुपारी तीनला बी. डी. भालेकर केंद्राबाहेर एक व्यक्ती दाखल झाला. त्याने त्याच्या जवळील बॅगेमधून पाकीट काढत ते मतदारांना वाटप करण्यास सुरवात केली. मतदान केंद्राबाहेर उपस्थित कार्यकर्त्यांना सदर प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने त्यांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी त्या व्यक्तीची कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. तसेच वाहनातून त्याला भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. दरम्यान, तैनात पोलिसांनी केंद्रामधील महसूल अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देत गुन्हा दाखल करण्यास सांगितले. परंतु, पैसे वाटप हे प्रवेशद्वाराबाहेर झाले असल्याने महसूल अधिकाऱ्यांनी हातवर केले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यावरुन काहीकाळ वादंग उभे ठाकले. सरतेशेवटी पोलिसांनी पुढे येत गुन्हा दाखल करीत या वादावर पडदा टाकला.

‘त्या’ शिक्षकांबद्दल चर्चा

बी. डी. भालेकर केंद्राबाहेर पैसे वाटपावेळी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून पोलिसांनी ६९ हजार ५०० रुपयांची रक्कम हस्तगत केली. परंतु, सदर व्यक्तीला कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडण्यापूर्वीच त्याने तिघा महिला मतदारांना पैशाने भरलेले पाकीट दिले. संबंधित महिलांनी पाकीट हाती पडताच केंद्राच्या परिसरातून धूम ठाेकल्याची चर्चा आहे. या संपुर्ण घटनाक्रमानंतर पाकीट घेणाऱ्या महिला कोण होत्या यावरुन उपस्थितांमध्ये खुमासदार चर्चा रंगल्या.

Nashik Teacher's Constituency Election 2024
शहरातील बी. डी. भालेकर स्कूलच्या मतदान केंद्रावर मतदार महिलेला मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याने बूथप्रमुखांना विचारणा करताना उमेदवार ॲड. संदीप गुळवे. (छाया हेमंत घोरपडे)

मतदाराला रोखल्याबद्दल ॲड. गुळवेंचा आक्षेप

मतदार शिक्षकाला मतदान करण्यापासून रोखल्याबद्दल उमेदवार ॲड. संदीप गुळवे यांनी आक्षेप घेतला. यावेळी बी. डी. भालेकर स्कूलच्या केंद्रावर बराच काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

मतदान संपायची वेळ सायंकाळी ६ ची होती. तोपर्यंत जे कोणी मतदान केंद्राच्या प्र‌वेशद्वाराच्या आतमध्ये असतील त्यांना मतदानाचा हक्क बजावता येतो, असा नियम आहे. तरीदेखील एका महिला शिक्षिकेला मतदानापासून वंचित ठेवण्यात आले. उमेदवार ॲड. गुळवे यांनी मतदान केंद्रावर चक्कर मारताना महिलेला मतदान केले का, अशी विचारणा केली असता त्यांनी वेळ संपल्याचे स्पष्ट केले. याबाबत ॲड. गुळवे यांनी बूथप्रमुखांना विचारणा केली. यावेळी बूथप्रमुख आणि उमेदवार यांच्यात बाचाबाची होताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. दरम्यान, या गदारोळामध्ये संबंधित महिला मतदार मतदान न करताच निघून गेली. त्यामुळे याबाबत तक्रार करणार असल्याचे ॲड. गुळवे यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news