नाशिक : गेल्या काही वर्षांपासून ज्यांनी हिरवे वस्त्र परिधान केले, त्या उद्धव ठाकरे सेनेच्या लोकांना आता तरी हिंदुत्वाची जाणीव व्हावी, असा टोला भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लगावला. मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर प्रतिक्रिया देताना सोमय्या यांनी गांधी परिवारावरही टीका केली.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या भेटीसाठी नाशिकमध्ये आलेल्या सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी आपल्या वडिलांसोबत तसेच आपल्या धर्मांसोबत उद्धव ठाकरे यांनी समझोता केला. आता निकालानंतरही त्यावर टीका करणे, प्रश्न विचारणे हे त्यांचे धाडसच असल्याचे उपरोधिकपणे ते म्हणाले. तसेच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खरे आरोपी कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्नच केला गेला नाही. या एका प्रसंगावरून हिंदू अतिरेकी आहेत, हे गांधी परिवाराने बोलण्यास सुरुवात केली. काँग्रेसचे तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी त्यावेळी 'हिंदू टेरर' असे नाटकीय दृश्य उभे केले. याचा त्यांना अजूनही पश्चात्ताप होत नाही. मात्र, लोक त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत. कधीतरी, कोणीतरी गांधी परिवारास हे तुम्ही का केले, असा प्रश्न विचारणारच. एक गोष्ट नक्की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मविआने केलेल्या लव्ह जिहाद, वोट जिहादची किंमत त्यांना विधानसभा निवडणुकीत मोजावी लागल्याचेही सोमय्या यांनी म्हटले.
मुंबई भोंगेमुक्त झाली असून, आता महाराष्ट्र भोंंगेमुक्त करायचा आहे. त्यासाठी संभाजीनगर आणि नाशिक पोलिस आयुक्तांची भेट घेतली. रविवारी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मला स्पष्टपणे सांगितले की, आम्ही सगळ्या भोंग्यांवर प्रतिबंध लावला आहे. हळूहळू भोंगे खाली उतरविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नाशिकमध्ये शंभर टक्के भोंग्यांवरील आवाज बंद झाला आहे. काही राहिला असेल तर आठवडाभरात पूर्णपणे बंद केले जाणार आहे. मला विश्वास आहे की, पुढील दहा दिवसांत नाशिक भोंगेमुक्त होणार असल्याचे किरीट साेमय्या म्हणाले.
एकीकडे धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरविले जात असताना, महापालिकेकडून शहरभर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांबाबत सोमय्या यांना विचारले असता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे भोंगे बसविले जाणार असून, त्याबाबतचा प्रशासनास अधिकार आहे. बाकी दुरुपयोग होता कामा नये. तसेच डीजेला परवानगी नसून, नियमांचा कोणी भंग करीत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही सोमय्या म्हणाले.