

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात उबाठातून भाजप आणि शिंदेसेनेत जाणाऱ्यांची रीघ लागली असताना, नाशिकमध्ये मात्र उबाठाने भाजपला धक्का दिला आहे. नाशिकरोड येथील भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती भाजपचे नाशिकरोड मंडलचे माजी अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी भाजपला रामराम करत उबाठात प्रवेश केला. सोमवारी (दि. २०) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी 'मातोश्री'वर शिवबंधन बांधले. नाशिकमध्ये 100 प्लसचा नारा देणाऱ्या भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतून महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये इनकमिंग वाढले आहे. उबाठातून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर या ३५ पैकी २२ जणांनी शिंदे गटात, तर पाच जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाचे तत्कालीन जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये, तर महानगरप्रमुख विलास शिंदेंनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे उबाठा गट नाशिकमध्ये खिळखिळा झाला. परंतु, आता उबाठाला लागलेली ही घरघर संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.
नाशिकमधील भाजपमधल्या अंतर्गत राजकारणामुळे भाजपमधून उबाठात इनकमिंग सुरू झाले आहे. भाजपच्या माजी नगरसेविकांसह शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनीही सोमवारी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. यावेळी सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, माजी आमदार वसंत गिते, जिल्हा सचिव मसूद जिलानी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरेंकडून फडणवीसांची खिल्ली
या प्रवेश सोहळ्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. आज नरक चतुर्दशी अर्थात नरकासुराचा वध करण्याचा दिवस आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रावरील भाजपचे नरकासुराचे संकट आपल्याला नेस्तनाबूत करायचे आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'मी पुन्हा येईल' या वक्तव्याचीही ठाकरेंनी खिल्ली उडवली. मीदेखील नाशिकला पुन्हा येईल. मी पुन्हा येईल मात्र नाशिकवर भगवा फडकवूनच जाईन अशी घोषणा करताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.
यांनीही केला प्रवेश
संगीता गायकवाड व हेमंत गायकवाड यांच्यासमवेत गोखले एज्युकेशन सोसायटीचे व्हा. चेअरमन प्रा. डॉ. लक्ष्मण शेंडगे, शिवांश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विवेक बागूल (राजपूत), मराठी महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षा रोहिणी उखाडे, प्रभाग २६ मधील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील, भाजप पदाधिकारी अंकुश व्हावल, समाजसेविका सीमा ललवाणी, बबिता मोरे, सुजाता गोजरे, सुजाता गवांदे, कांचन चव्हाण, जयकुमार ललवाणी, सत्यम खोले, हर्ष चव्हाणके यांनी उबाठात प्रवेश केला.