Nashik Politics | भाजप शहराध्यक्षपदी सुनील केदार

जिल्हाध्यक्षपदी सुनील बच्छाव, यतीन कदम
नाशिक
नाशिक दौऱ्यापूर्वीच भाजप शहर- जिल्हाध्यक्षांच्या प्रलंबित नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वीच भाजप शहर- जिल्हाध्यक्षांच्या प्रलंबित नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. भाजपचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे सरचिटणीस सुनील केदार यांना शहराध्यक्षपदी बढती देण्यात आली.

Summary

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही भाजपने भाकरी फिरवली असून, उत्तर नाशिक जिल्हाध्यक्ष पदावरून शंकर वाघ यांना हटवून त्यांच्या जागी मनसेतून आलेल्या यतीन कदम यांची नियुक्ती करण्यात आली, तर नाशिक दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सुनील बच्छाव यांना मात्र कायम ठेवण्यात आले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक बांधणीची मोहीम हाती घेतली आहे. बूथप्रमुख ते प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतच्या नियुक्त्या नव्याने केल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील १,२२१ मंडल अध्यक्षांची निवडप्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राज्यातील ८० पैकी ५८ शहर- जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र त्यात नाशिकच्या संघटनेतील पदांच्या नियुक्त्यांची घोषणा स्थगित ठेवण्यात आली होती. नाशिकमध्ये संघटनेचे तीन जिल्हे असून, त्यानुसार नाशिक शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव, उत्तर नाशिक जिल्हाध्यक्षपदी शंकर वाघ, तर दक्षिण नाशिक जिल्हाध्यक्षपदी सुनील बच्छाव कार्यरत होते. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष निवडीबाबतची प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती.

नाशिक शहराध्यक्षपदासाठी प्रशांत जाधव यांच्यासह अनिल भालेराव, नाना शिलेदार, सुनील केदार, निखिल पवार, पवन भगूरकरसह डझनभर इच्छुक होते. त्यामुळे निरीक्षकांनी इच्छुकांची नावे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे पाठवली होती. शहरातील आमदारांसह संघटनेला समावून घेईल असा चेहरा संघटनेला हवा होता. दरम्यान, या नियुक्त्यांवरून भाजपमध्ये वर्चस्ववादाची लढाई सुरू झाली होती. शहरातील आमदार आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपापल्या मर्जीतील नियुक्तीसाठी जोर लावल्याने या नियुक्त्या रखडल्या होत्या. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याच्या आदल्या दिवशी भाजपने उर्वरित २२ अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यात नाशिकमधून सुनील केदार, यतीन कदम, सुनील बच्छाव यांच्या नावांचा समावेश आहे.

निष्ठावंताला मिळाली संधी

केदार हे भाजपचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. ते १९९० पासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. २००९ ते २०१३ या कालावधीत ते पंचवटी मंडल अध्यक्ष होते. २०१३ ते २०१६ आणि २०१९ पासून नियुक्तीच्या घोषणेपर्यंत ते शहर सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. त्यांची शहराध्यक्षपदावर नियुक्ती करून पक्षाने या पदासाठी सुरू असलेल्या चढाओढीत मध्यम मार्ग स्वीकारला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची ताकद कायम ठेवण्याचे आव्हान केदार यांच्यासमोर असणार आहे.

संघटनेतील सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला शंभरहून अधिक जागांवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

सुनील केदार, नवनियुक्त शहराध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news