

नाशिक : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीतून स्वत:च्या पुढच्या पिढीचे लॉन्चिंग करण्याचा नाशिकमधील दोघा आमदारांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. आमदार, खासदारांच्या मुलांना, नातेवाईकांना महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी न देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेनंतर नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पुत्र अजिंक्य फरांदे तर नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी पुत्री रश्मी हिरे-बेंडाळे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील सहा लोकप्रतिनिधींकडून नऊ जणांना तर पिंपरी-चिंचवडमधील लोकप्रतिनिधींकडून दोघांना उमेदवारी देण्याचा घाट घालण्यात आला होता. राज्यात हा आकडा १००हून अधिक असल्याने भाजपमधील संभाव्य घराणेशाहीवरून खदखद होती. मुख्यमंत्री फडणवीस तसेच राष्ट्रीय सहसंघटन सरचिटणीस शिवप्रकाश यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत या उमेदवारींबाबत पडसाद उमटले होते. या बैठकांनंतर अवघ्या ४८ तासांत पक्षाने निर्णय घेत वाढत्या घराणेशाहीला थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षाच्या या आदेशांना सर्वप्रथम आमदार फरांदेनी प्रतिसाद देत,अजिंक्य फरांदेची उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ आ. सीमा हिरे यांनी देखील रश्मी हिरे यांची उमेदवारी मागे घेणार असल्याचे जाहीर केले.
फरांदे कुटुंबीय गेल्या चार दशकांहून भाजपच्या संघटन वाढीसाठी कार्यरत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्ष नेतृत्वाच्या आदेशाचे पालन करून अजिक्य फरांदेची उमेदवारी मागे घेतली आहे.
देवयानी फरांदे, निवडणूक प्रमुख भाजप
अजिंक्य फरांदेकडून माघारीची घोषणा
भाजपने आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या नातेवाईंकांना उमेदवारी देण्याचा घेतलेला निर्णय शिरसावंद्य असून, त्या निर्णयाचा सन्मान राखत प्रभाग क्रमांक ७ मधून संभाव्य उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा अजिंक्य फरांदे यांनी केली आहे. यावेळी नगरसेवक होण्याची संधी मिळाली नसली, तरी प्रभागातील विकासकामे, मूलभूत समस्या आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पूर्वीप्रमाणेच निष्ठेने आणि जबाबदारीने कार्य करत राहण्याचा मन:पूर्वक शब्द त्यांनी दिला. प्रभाग क्रमांक ७ हा आपल्या कुटुंबासारखा असून, येथील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाची जाणीव मनात ठेवून पुढील वाटचाल सुरू राहील, असेही फरांदेनी स्पष्ट केले आहे.
हिरे कुटुंबिय भाजपचे कायम निष्ठावान राहिले आहे. पक्षाच्या आदेशांचे पालन केले जाईल. रश्मी हिरे यांनी प्रभाग ८ मधून ओबीसी महिला जागेकरीता दाखल केलेली उमेदवारी मागे घेतली जाईल.
सीमा हिरे, आमदार.